माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांचे प्रतिपादन पारनेर | नगर सह्याद्री आजच्या काळात विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम...
माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांचे प्रतिपादन
आजच्या काळात विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ण्ड सायन्स महाविद्यालयात महाविद्यालय विकास समिती सभेच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, खजिनदार डॉ. विवेक भापकर हे उपस्थित होते.याप्रसंगी झावरे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. बदलत्या काळाला अनुसरून कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची रचना करणे ही काळाची गरज बनली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना प्राधान्य राहणार आहे. त्यानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र इ. विद्याशाखातील विद्यार्थी विविध विषय घेऊन प्रमाणपत्र कोर्स, डिप्लोमा,पदविका, पदवी प्राप्त करणार आहेत. बदलत्या काळाच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची आखणी महाविद्यालय पातळीवर सुरू करणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा होतकरू, परिस्थितीची जाणीव असणारा, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणारा असतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना उद्याच्या काळात रोजगार मिळावा त्यांना त्यांच्या आयुष्यात उभे राहता यावे. याचा सर्वांगीण विचार करून अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे अनिवार्य आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी बारकाईने अभ्यास करून शिक्षणात होणारे नवीन बदल स्वीकारायला हवेत. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. तर आभार उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ. दिलीप ठुबे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ हरेश शेळके यांनी केले.
COMMENTS