12 गावांमध्ये बिनविरोध निवड; चार गावांमध्ये मतदान । उपसरपंच निवडीत काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये नाट्यमय घडामोडी पारनेर । नगर सह्याद्री ...
तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीसाठी गुरूवारी घेण्यात आलेल्या निवडणूकीत 12 गावांमध्ये बिनविरोध निवडी झाल्या तर उर्वरीत चार गावांमध्ये उपरपंचपदासाठी मतदान घेण्यात आले. उपसरपंच निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवत 13 ग्रामपंचायतींमध्ये यश संपादन केले तर शिवसेनेला 2 तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला एका ठिकाणी यश आले.
चोंभूतमध्ये शेळके गटाकडे सहा सदस्य असूनही एक सदस्य फुटल्याने सरपंचपदाच्या दोन मताधिकाराच्या जोरावर म्हस्के गटाने शेळके गटावर पुन्हा एकदा मात केलीे. ढवळपुरीच्या उपसरपंच निवडीमध्ये पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकाने माघार घेतली तर दोघांनी गावडे गटाचे बबनराव पवार यांना पाठींबा दिला. त्यामध्ये 11 मते घेऊन गावडे गटाचे बबनराव पवार विजयी झाले. भाळवणी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी सरपंचपदाच्या दोन मतांच्या जोरावर उपसरपंचपद आपल्याकडे राखण्यात यश मिळविले.
त्यांचे उमेदवार अप्पासाहेब रोहोकले हे विजयी झाले. विरोधी मनिषा चेमटे यांना पराभव पत्करावा लागला. गोरेगांव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बाबासाहेब तांबे गटाचे अण्णासाहेब नरसाळे यांनी 6 मते मिळवून त्यांचे प्रतिस्पर्धी प्रविण नरसाळे यांचा 1 मताने पराभव करीत शिवसेनेची सत्ता अबाधित राखली.
वनकुटे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीत संगिता काळनर यांनी बिनविरोध उपसरपंच होण्याचा मान पटकावला. ग्रामपंचायतीत सत्तांतरानंतर डॉ. नितिन रांधवन यांनी उपसरपंचपदाच्या निवडणूकीतही यश संपादन केले. चोंभूतच्या निवडणूकीत शेळके गटाला पुन्हा धक्का बसला. म्हस्के गटाने शेळके गटाच्या महिला सदस्याला उपसरपंचपदाची ऑफर देत सरपंचपदाच्या दोन मतांच्या जोरावर उपसरपंचपदही आपल्या ताब्यात घेतले.
भोंद्रे उपसरपंचपदाच्या निवडणूकीत सरपंच गणेश झावरे यांच्या विरोधी गटाकडे अधिक सदस्य असतानाही त्यांनी उपसरपंचपदासाठी उमेदवार दिला नाही. सरपंच यांना दोन मतांचा अधिकार असल्याने गणेश झावरे यांचाच उमेदवार विजयी होणार हे निश्चित होते. त्यांच्या पॅनलचे उमेदवार इंद्रभान झावरे हे विजयी झाले.पळशी ग्रामपंचायत निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे सरपंच प्रकाश राठोड यांच्या पॅनलच्या सुनंदा अगिवले बिनविरोध उपसरपंच झाल्या. मावळते सरपंच अप्पासाहेब शिंदे यांनी उपसरपंच निवडणूकीसाठी उमेदवार दिला नाही.
सिध्देश्वरवाडीमध्ये स्वप्नाली ठुबे यांनी बिनविरोध निवडणूक जिंकत सरपंच संतोष कावरे यांच्या पॅनलचे वर्चस्व सिध्द केले. पिंपळगांवतुर्कमध्येही इसाक गुलाब शेख बिनविरोध उपसरपंच झाले. गुणोरेमध्ये बहुमत मिळविल्याने अण्णासाहेब बढे यांच्या गटाचे किशोर रायचंद गोपाळे यांची बिनविरोध निवड झाली. हत्तलखिंडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महेंद्र गायकवाड यांनी दणदणीत विजय संपादन केल्यानंतर उपसरपंचपदाच्या निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे अशोक लक्ष्मण शेळके हे बिनविरोध विजयी झाले.
पुणेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत बाजार समितीचे संचालक मारूती रेपाळे यांनी पुन्हा सत्ता काबीज केली. उपसरपंचपदाच्या निवडीत त्यांच्या गटाचे प्रशांत बोरूडे बिनविरोध उपसरपंच झाले. करंदीच्या उपसरपंच निवडीमध्ये शिवसेनेचे उपसरपंचपदाचे उमेदवार अर्जुन ठाणगे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. परंतू त्यांनी ते मागे घेतल्याने अर्जुन ठाणगे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. म्हस्केवाडीमध्ये किरण पानमंद यांनी पुन्हा एकहाती वर्चस्व मिळविल्यानंतर उपसरपंच निवडीतही गोविंद साबळे बिनविरोध विजयी झाले.
COMMENTS