शहरात किड्स फेस्टिव्हलचे प्रारंभ । नन्हा ज्ञान फाऊंडेशन व द आयकॉन पब्लिक स्कूलचा संयुक्त उपक्रम अहमदनगर । नगर सह्याद्री अभ्यासाबरोबर विद्या...
अहमदनगर । नगर सह्याद्री
अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना कला, क्रीडा गुणांबरोबर संस्काराला प्रोत्साहन शाळेतून मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी व भविष्यातील प्रश्नांचा वेध घेणारी शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून पृथ्वीचे अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण व आरोग्याच्या प्रश्नावर शिक्षण देऊन संस्कारमय पर्यावरणवादी भावी पिढी घडवावी लागणार असल्याचे प्रतिपादन शासनाच्या आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
लहान मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी नन्हा ज्ञान फाऊंडेशन (पुणे) व द आयकॉन पब्लिक स्कूल यांच्या वतीने आयोजित किड्स फेस्टिव्हलच्या उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री पवार बोलत होते. रेल्वे स्टेशन रोड येथील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये सुरु झालेल्या दोन दिवसीय किड्स फेस्टिव्हलच्या कार्यक्रमासाठी रमेश फिरोदिया, आयकॉन स्कूलचे फाऊंडर चेअरमन अशोक मुथा, मंगला मुथा, अमित मुथा, सोनल मुथा, गौरी मुथा, नन्हा ज्ञान फाऊंडेशनच्या संस्थापिका रोमल सुराणा, प्रीतिज पाठशाळाच्या प्रिती मुथीयान, शैलेजा लड्डा, आराधना राणा, प्रन्सिपल दिपिका नगरवाला आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मश्री पवार म्हणाले की, रासायनिक खतामुळे आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.
केमिकलयुक्त आहार पोटात जात असल्याने अनेक आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सदृढ आरोग्यासाठी नैसर्गिक खतांची गरज आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे भविष्यात मनुष्याला सकस आहार मिळणे देखील अवघड होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. भविष्यातील धोके ओळखून विद्यार्थ्यांना लहान वयातच शिक्षण देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
किड्स फेस्टिव्हलमध्ये 22 शाळांचे चारशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी वक्तृत्व, चित्रकला, शास्त्रीय नृत्य, कविता वाचन, कथाकथन, फॅन्सी ड्रेस आणि इतर विविध स्पर्धा रंगल्या होत्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कला-गुणांचे सादरीकरण करुन धमाल केली. तर लावण्यात आलेल्या स्टॉलवर विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळांचा आनंद लुटला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा मनोरंजनाबरोबर कला-गुणांचा विकास साधण्यात आला.
या किड्स फेस्टिव्हलला शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनचे मुख्य प्रायोजक लाभले असून, आकाश आणि बायजू हे सहयोगी भागीदार आहेत. तर प्रीतिज पाठशाळा आणि टॉट्स टू टीन्स समुपदेशन फर्मचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे.
COMMENTS