पारनेर । नगर सह्याद्री आज समाज जीवनामध्ये वेगाने बदल घडत आहेत. समाज जीवनामध्ये वाटचाल करत असताना शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जोपासणे काळाची...
पारनेर । नगर सह्याद्री
आज समाज जीवनामध्ये वेगाने बदल घडत आहेत. समाज जीवनामध्ये वाटचाल करत असताना शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जोपासणे काळाची गरज आहे. आज माहिती तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे या अशा वातावरणात माध्यमांचा अतिवापर समाजामध्ये विविध गोष्टींसाठी केला जातो. या पार्श्वभूमीवर विचारशील समाज घडवण्याचे महत्त्वपूर्ण काम हे महाविद्यालये करत असतात असे मत आठरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
या प्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी खानदेश, खजिनदार डॉ.विवेक भापकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ.दिलीप ठुबे हे उपस्थित होते.
न्यू आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समिती सभेच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सह -सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील म्हणाले की, महाविद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य असते. या उपक्रमांतून समाजातल्या विविध सामाजिक प्रश्नांवर विविध अंगाने भाष्य केले जाते त्यातून विद्यार्थ्यांना समाजातल्या व जीवनातल्या विविध प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी मिळते.
पुढे ते म्हणाले, महाविद्यालयात शिकवणार्या प्राध्यापकांचे शालेय शिक्षणाशी असलेले नाते सद्यःस्थितीमध्ये तुटलेले दिसून येते. हे नाते पुन्हा जोडणे अत्यंत आवश्यक आहे ते पुढे म्हणाले की, सर्वसमावेशकता हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मुख्य आधार आहे. दर्जा म्हणजे केवळ भौतिक सुविधा नव्हे तर दर्जा म्हणजे साध्य आहे. हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण इमारती कितीही अद्यावत असल्या तरी त्यामधून विद्यार्थी कसा घडून बाहेर पडणार आहे हे महत्त्वाचे आहे. जे शिकतो ते उपयुक्त असेल तर ती आहे कॉलिटी. या शैक्षणिक धोरणात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे उत्तरदायित्व व परवडणारी क्षमता सर्व शिक्षण व्यवस्था समजून घेणे म्हणजेच उत्तरदायित्व आणि परवडणारी क्षमता होय.
नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश एका वाक्यात सांगायचं असेल तर तो म्हणजे समृद्ध माणूस घडविणे, उत्तम नागरिक घडविणे आहे. सर्वगुणसंपन्न होणे कठीण आहे. पण बहुगुण संपन्न होणे शक्य आहे. यासाठी ध्येय इच्छा व ज्ञान आवश्यक आहे. समृद्ध माणूस म्हणजे विवेक व समतोल विचारावर आधारित कृती. समाज व व्यक्तीबद्दल करुणा, आस्था व सहानुभूती असणे, धैर्य असणे, वैज्ञानिकता, चारित्र्यसंपन्नता या सर्वांनी मिळून माणूस समृद्ध होतो. चारित्र्यसंपन्न असणे म्हणजे सुसंस्कृतता आहे. निर्व्यसनी असणे आहे.
आणखी व्यापक अर्थ म्हणजे माझा देश या देशाचा इतिहास या बद्दल संपूर्ण माहिती असायला हवी. विज्ञान व तंत्रज्ञानाने आपली प्रगती होऊ शकते. हा ठाम विश्वास असणे आज काळाची गरज आहे. आजचा अभ्यासक्रम क्रेडिट पॅटर्नवर आधारित आहे. क्रेडिट म्हणजे काय तर ज्ञानसंचय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा त्यांना किती ज्ञान मिळालं हे महत्त्वाचे आहे.
याप्रसंगी प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवल्याबद्दल पूजा बुगे व साक्षी फटांगडे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा विभागांमध्ये यश संपादन केल्याबद्दल क्रॉस कंट्री या विभागात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल करण गहांडूळे व कुस्ती या स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल उचाळे ऋषिकेश या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आर्थिक सहाय्यता निधी अंतर्गत ढोरमले प्रज्ञा ढोरमले, ढोरमले प्रतिक व किशोर बोबडे या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. तसेच याप्रसंगी ढोरमले प्रज्ञा, किशोर बोबडे व साक्षी फटांगडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हरेश शेळके व आभार डॉ. दिलीप ठुबे यांनी मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केल
COMMENTS