महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध; वाचाळवीरांनी इतिहास जाणून घेण्याची गरज: काळे अहमदनगर | नगर सह्याद्री भाजपचे नेते आणि उ...
महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध; वाचाळवीरांनी इतिहास जाणून घेण्याची गरज: काळे
अहमदनगर | नगर सह्याद्रीभाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारुन जोरदार निदर्शने करण्यात आली.
मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड, महिला नेत्या प्रविणाताई घैसास, आय.टी. सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, विशाल कांबळे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका उपाध्यक्ष विलास साळवे, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, आयटी सेल भिंगार शहराध्यक्ष विक्रम चौहान, रोहित कांबळे, सदाशिव भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, अशोक भिंगारदिवे, गौतम क्षेत्रे, शकील शेख, शेखर सरोदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, राज्यपालापासून भाजपचे मंत्री व नेते राष्ट्रपुरुषांबाद्दल वारंवार वादग्रस्त विधान करुन त्यांची चेष्टा करत आहे. महापुरुषांबद्दल चुकीचे विधान करुन समाजात असंतोष पसरविण्याचे काम केले जात आहे. अशा वाचाळवीरांनी खरा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा उध्दार करणार्या महापुरुषांबद्दल केले गेलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी महापुरुषांबद्दल वारंवार होणारे चुकीचे विधान निंदनीय आहे. असल्या वादग्रस्त विधानाने समाजात चिड निर्माण होत आहे. महापुरुषांच्या त्यागाचा व कार्याचा अपमान केला जात असून, वाचाळवीरांवर कारवाई झाल्यास खर्या अर्थाने अशा गोष्टींवर लगाम लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS