मंगळवारी तहसील कार्यालयात मतमोजणी; भाळवणीत एक तास मतदान यंत्रात बिघाड पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील १६ गावातील ग्रामपंचायतीसाठी ...
मंगळवारी तहसील कार्यालयात मतमोजणी; भाळवणीत एक तास मतदान यंत्रात बिघाड
पारनेर | नगर सह्याद्रीपारनेर तालुक्यातील १६ गावातील ग्रामपंचायतीसाठी मतदान रविवारी दि.१८ डिसेंबर रोजी पार पडले असुन या १६ गावात ८६.२१% मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. तर दुसरीकडे मतदानावरून तुरळक वादावादी वगळता तालुयात शांततेत मतदान पार पडले.
मंगळवारी सकाळी ९ वाजता पारनेर तहसील कार्यालयामध्ये या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून ६ टेबलवर ५० नियुक्त करण्यात आलेले आहे. तर सरपंचासह सदस्यांच्या ११ मतमोजणीच्या फेर्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली आहे. तर मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात ढवळपुरी भाळवणी व वनकुटे या ३ गावची मतमोजणीला सकाळी ९ वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती सुद्धा तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली आहे. त्यामुळे या १६ ग्रामपंचायतीच्या गाव पदाधिकार्यांचा फैसला मंगळवारी होणार आहे.
पारनेर तालुयातील १६ गावातून सरपंच पदासाठी ४३ उमेदवार तर सदस्य पदासाठी ३३५ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी तालुक्यात ६९ मतदान केंद्र तयार करण्यात आली होते. त्यामध्ये ३९ हजार ६७९ मतदारांपैकी ३४ हजार २०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तालुयात ८६.२१ टक्के झाले.
तालुक्यातील भाळवणी गोरेगाव व ढवळपुरी येथे उमेदवारांमध्ये रस्सीखेच होती. त्यामुळे येथे मतदार केंद्रापर्यंत आणण्यात संघर्ष पाहायला मिळाला या तीनही केंद्रावर राखीव पोलीस तैनात करण्यात आले होते.
मतदानानंतर १६ सरपंच पदासाठीच्या ४३ तर २२३ ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या ३३५ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले आहे. या सर्व निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार शिवकुमार कवळकंठे यांच्या मार्गदर्शना खाली नायब तहसीलदार गणेश आढारी मतदान प्रक्रिया सर्वत्र व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्था केली होती. तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये या करीता पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सपोनी प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर यांच्या सह पोलिसांचे विशेष पथक मतदान स्थळी तैनात करण्यात आले होते. तर मतदानानंतर उमेदवारांसह निकालाकडे तालुयाचे लक्ष लागले आहे. मतमोजणी प्रतीक्षा आता गावातील प्रमुख नेत्यासह कार्यकर्त्यांना लागली आहे.
पारनेर तालुयातील १६ गावांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून यामध्ये सर्वाधिक मतदान पाडळी तर्फे कान्हुर ९५.२७ % झाले आहे. पारनेर तालुक्यातील १६ गावांतील ग्रामपंचायत मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे - भाळवणी- ८९.९६, ढवळपुरी- ७५.६६, गोरेगाव- ९०, वनकुटे- ८१.९९, पळशी- ८६.९३, पिंपळगावतुर्क- ९४.८३, भोंद्रे- ८८.४९, पुणेवाडी- ८३.४१, करंदी- ९२.५५, हत्तलखिडी- ९०.२१, चोंभूत- ९१.४३, गुणोरे- ९२.७३, म्हस्केवाडी- ८६.६१, कोहकडी- ८७.९९, पाडळी तर्फे कान्हूर- ९५.२७, सिध्देश्वर वाडी ९४.०६% मतदान झाले.
पिंपळगाव तुर्कमध्ये कपाट झाकण्याची वेळ
पारनेर तालुयातील १६ ग्रामपंचायतची निवडणुकीत पिंपळगाव तुर्क या गावांमध्ये सुद्धा रविवारी मतदान घेण्यात आले असून एका उमेदवाराला कपाट चिन्ह मिळाले होते. तर मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी मतदान घेण्यात आले त्या प्राथमिक शाळेमध्ये कपाट होते. या कपाटावरच समोरच्या उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने अखेर हे कपाट झाकण टाकून झाकण्याची वेळ मतदान अधिकारावर आली.
भाळवणीच्या बुथ क्रमांक ४ मध्ये मतदान रखडले
भाळवणी येथे वार्ड क्रमांक ४ मध्ये ईव्हिएम मशिनमध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जवळपास एक तास मशीन बंद होते. या मतदान केंद्रावर जवळपास ८५२ इतके मतदान असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत मतदार रांगेत उभे होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या काही वेळ रांगा लागल्याचं दिसून आले. मात्र प्रशासनाने तात्काळ त्यावर उपाययोजन करत प्रक्रिया सुरळीत केली.
COMMENTS