मुंबई । नगर सह्याद्री - राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. भावी मंत्र्यांची आता धाकधूक वाढली आहे. शिंदे - फडणवीस सरक...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. भावी मंत्र्यांची आता धाकधूक वाढली आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार आता पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.
खरी शिवसेना कुणाची? यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. सुनावणीत दोन्ही गटांकडून युक्तिवाद केले जात आहे. दरम्यान, या सुनावणीचा निकाल २० जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय येताच, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे,फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा होती. मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळचा विस्तार होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनासाठी आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे.
दरम्यान, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या दमाच्या आमदारांना संधी देणार असल्याची माहिती आहे. तसेच वादग्रस्त विधाने करणाऱ्या वाचाळविरांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यासाठी नवी टीम तयार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
विशेष बाब म्हणजे, वारंवार ठाकरे गटात जाण्याची धमकी देणाऱ्या आमदारांना या मंत्रीपद न देण्याचा निर्णय सुद्धा एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची माहिती आहे. शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवं आहे. जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर हे आमदार फुटतील, या भीतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचे विरोधकांनी म्हटले होते.
COMMENTS