औरंगाबाद। नगर सह्याद्री - राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे तर आज निकाल हाती आला आहे. राज्यातील बहुतांश ग्रामप...
औरंगाबाद। नगर सह्याद्री -
राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे तर आज निकाल हाती आला आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळत आहे. अशातच, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे प्राथामिक कल हाती आले असून औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का दिला आहे.
औरंगाबादेत जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिडकीन ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली आहे. बिडकीनमध्ये ठाकरे गटाचे अशोक धर्मे यांनी विजय मिळवला आहे. अशोक धर्मे हे जवळपास १२०० मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत निवडणूक असल्याने जवळपास सर्वच दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
निवडणुकीत आपल्याच पॅनलचा विजय व्हावा, तसेच ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहे. औरंगाबादेतील २१६ ग्रामपंचायतीपैकी जवळपास ८३ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ठाकरे गट १७, शिंदे गट २६, भाजपा २० राष्ट्रवादी ५, काँग्रेस ५ आणि इतर १० ग्रामपंचातीवर अपक्षांनी बाजी मारली आहे.
COMMENTS