महामार्ग दुरुस्ती सुरू होईपर्यंत उपोषण - आमदार लंके ठाम / विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून चौकशी व पाठिंबा अहमदनगर । नगर सह्याद्री म...
महामार्ग दुरुस्ती सुरू होईपर्यंत उपोषण - आमदार लंके ठाम / विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून चौकशी व पाठिंबा
अहमदनगर । नगर सह्याद्री
मनमाड, पाथर्डी व सोलापूर या तीन राष्ट्रीय मार्गाची गेल्या दोन वर्षापासून झालेल्या दुरावस्थेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी बुधवारपासून (दि. 7) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. महामार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार, असा ठाम निर्धार आ. लंके यांनी केला आहे.
या उपोषणाला भाजप वगळता इतर सर्व पक्ष, तसेच बार असोसिएशनसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आ. लंके यांच्या उपोषणाचा गुरुवारी दुसरा दिवस असून या उपोषणाला पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, नेवासा, राहुरी, नगर व पारनेर मतदारसंघातून मोठा मिळत असल्याचा दावा लंके समर्थकांनी केला आहे. उपोषणस्थळी पाथर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंतांनी आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला; परंतु हाकेच्या अंतरावर असणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना चर्चा करण्यासाठी वेळ नाही का, असे म्हणत मी उपोषणावर ठाम असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. जिल्हाधिकार्यांसह संबंधित अधिकार्यांवर दबाव असल्याने ते चर्चेसाठी येत नसल्याचा आरोप आमदार लंके यांनी केला. त्यामुळे आमदार लंके यांनी उपोषणस्थळी बुधवारी सायंकाळी भजन संध्याचे आयोजन करून गांधीगिरी केली.या आंदोलनाला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादासाहेब कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, घनश्याम शेलार, सभापती क्षीतीज घुले, माजी सभापती बाळासाहेब हराळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, अॅड. श्याम आसावा, शेतकरी संघटनेचे रविराज जाधव, अंबादास गारुडकर, धनराज गाडे, राजेंद्र दौड, किसन चव्हाण, रेणुकाताई पुंड, अॅड हरिहर गर्जे, शिवशंकर राजळे, सतीश पालवे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, संजय लाकुडझोडे, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सौ सुरेखा भालेकर, बा. ठ. झावरे, रा. या. औटी, जितेश सरडे, डॉ बाळासाहेब कावरे, सतीश भालेकर, अनिल गंधाक्ते, दौलत गांगड यांच्यासह विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
अजितदादांकडून चौकशी
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांची चौकशी करून आंदोलनाची माहिती घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगत उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
विखेंच्या बालेकिल्ल्यातून पाठिंबा
लोणी खुर्दच्या कृषिभूषण तथा पंचायत सदस्या प्रतिमा घोगरे यांनी आमदार लंके यांची भेट घेत पाठिंबा दिला. त्या म्हणाल्या, नगर-शिर्डी मार्गावर अनेकांचे बळी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी निर्मळ येथील तरूणाचा मृत्यू झाला, तो घरातील कमवता मुलगा होता. चाळीस वर्षे राजकारण करणार्यांनी केवळ आश्वासने दिली. रस्त्याची दुरवस्था झालेली असताना स्वतः हेलिकॉप्टरमधून फिरत आहेत.
COMMENTS