नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आणि ६ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
मुंबई / नगर सह्याद्री -
मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आणि ६ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. न्यायालयाने ईडीला नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबत दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच नवाब मलिक यांना नवीन वर्षाच्या मुहूर्तावरही तुरुंगातच राहावे लागणार आहे.
नवाब मलिक यांनी सोमवारी (१२ डिसेंबर) उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मलिक यांनी वकील तारक सय्यद आणि कुशल मोर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणीसाठी वेळ दिली होती. याआधी ३० नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालयाने या प्रकरणात नवाब मलिकयांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
नवाब मलिक यांच्यावर फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिक यांना अटक केली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहे. त्यांच्यावर सध्या येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
COMMENTS