विरोधी महाविकास आघाडीने (एमव्हिए) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या धोरणाविरोधात १७ डिसेंबरला मुंबईत सर्वपक्षीय निषेध मोर्चाची घोषणा केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
विरोधी महाविकास आघाडीने (एमव्हिए) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या धोरणाविरोधात १७ डिसेंबरला मुंबईत सर्वपक्षीय निषेध मोर्चाची घोषणा केली. नागपुरात राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा राजकारणासाठी नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यापुढेही टिकाव धरू न शकणाऱ्या भ्याड महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सर्व पक्ष, संघटना आणि व्यक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी एमव्हीए नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना संबोधित केले. भायखळ्यातील जिजामाता उद्यानापासून सकाळी ११ वाजता एमव्हीएचा निषेध मोर्चा निघेल आणि सीएसएमटीच्या आझाद मैदानापर्यंत जाईल. हा मोठा निषेध मोर्चा असेल, असे ठाकरे म्हणाले.
COMMENTS