मोर्चा १७ डिसेंबर रोजी मुंबईतील भायखळा जिजामाता पार्क येथून सकाळी ११.३० वाजता सुरू होईल आणि दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर संपेल.
मुंबई / नगर सह्याद्री -
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीचे नेते निषेध मोर्चा काढणार आहेत. काँग्रेस नेते नसीम खान यांनी सांगितले की, निषेध मोर्चाच्या तयारीबाबत रविवारी विरोधी गटांची बैठक झाली असून हा मोर्चा १७ डिसेंबर रोजी मुंबईतील भायखळा जिजामाता पार्क येथून सकाळी ११.३० वाजता सुरू होईल आणि दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर संपेल. हा मोर्चा राजकारणासाठी नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असल्याचे ते म्हणाले.
नसीम खान पुढे म्हणाले, या आंदोलनात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नेते सहभागी होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद हा आगामी निषेधादरम्यान अधोरेखित होणार्या मुद्द्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या आक्रमक भूमिकेकडे मूक प्रेक्षक असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर एमव्हीएचा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगितले होते.
राज्यपाल आणि सरकारकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जात असल्याचा दावा कर्नाटककडून केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यामुळे महापुरुषांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे ते म्हणाले.
COMMENTS