मुंबईत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाने ३०० चा टप्पा ओलांडला तर काही ठिकाणी २०० चा टप्पा ओलांडला.
मुंबई / नगर सह्याद्री -
देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची जगभरात चर्चा होत असली तरी आता मुंबईही यापासून लांब राहिलेली नाही. अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. मुंबईत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाने ३०० चा टप्पा ओलांडला तर काही ठिकाणी २०० चा टप्पा ओलांडला. सोमवारी मुंबईची एकूण एक्यूआय पातळी २२५ नोंदवण्यात आली. तर दिल्लीची एकूण एक्यूआय पातळी १५२ होती. ही आकडेवारी एसएएफएआर (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) ची आहे ज्याने मुंबईची एक्यूआय पातळी खराब असल्याचे नोंदवले आहे. तथापि, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एक्यूआय पातळीची नोंद झाली. मालाडमधील हवेची गुणवत्ता ३११ होती जी अत्यंत खराब आहे. त्यापाठोपाठ मांढगाव आणि चेंबूरमध्ये ३०३ होते. वांद्रे-कुर्ला येथे एक्यूआय पातळी २६९ नोंदवण्यात आली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) नुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता १६८ (मध्यम) आणि दिल्लीतील २१८ (खराब) आहे. आता सीपीसीबी आणि एसएएफएआर च्या आकडेवारीत फरक का आहे याबद्दल बोलूया. खरं तर, एसएएफएआर ची शहरातील नऊ ठिकाणी निरीक्षण केंद्रे आहेत तर सीपीसीबी १८ स्थानांवर आधारित एकूण एक्यूआय मोजते. दुसरीकडे, सीपीसीबीची दिल्लीत ३६ वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आहेत.
काही दिवसांपूर्वी, जी२० शेर्पा अमिताभ कांत आणि महापालिका आयुक्त आयएस चहल यांच्यात झालेल्या संभाषणात मुंबईतील खराब एक्यूआय चा मुद्दा पुढे आला होता. चहल यांनी मोठ्या प्रदूषणासाठी रिफायनरीज आणि टाटा पॉवर प्लांटला जबाबदार धरले, तर कांत यांनी सांगितले की रिफायनरीजमधून सल्फर-डायऑक्साइड उत्सर्जन निर्धारित नियमांमध्ये होते. केंद्रीय पेट्रोलियम सचिव एम एम कुट्टी यांच्याशीही संवाद साधतांना कांत म्हणाले की, माहुल भागातील दोन रिफायनरींनी सल्फरचे उत्सर्जन कमी होईल याची खात्री करावी लागेल.
COMMENTS