श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयात ज्ञानक्रांती ज्योतीचे स्वागत अहमदनगर | नगर सह्याद्री मुलामुलींनो परस्थितीचा बाऊ करू नका सावित्रीब...
श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयात ज्ञानक्रांती ज्योतीचे स्वागत
अहमदनगर | नगर सह्याद्री
मुलामुलींनो परस्थितीचा बाऊ करू नका सावित्रीबाईंनी आपल्यापेक्षा हजार पटीने वाईट परिस्थिती असताना त्यांनी मोठे शैक्षणिक कार्य उभे केले. आपण पूर्णक्षमतेने शिक्षण घेऊन आपले कर्तृत्व उभे करा आणि कर्तृत्व उभे करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योतीताई गडकरी यांनी केले.
सावित्री उत्सवाच्या निमित्ताने निघालेल्या ज्ञानक्रांती ज्योतीच्या श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयात स्वागतावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्म होते. यावेळी सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष अनिल जाधव, जिज्ञासा अकादमीचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, ज्योतप्रमुख श्रीकांत वंगारी, नगरसेवक मनोज दुलम, संचालक डॉ रत्ना बल्लाळ, राजू म्याना, नंदाताई माडगे, विनोद म्याना, विद्या एक्कलदेवी आदी उपस्थित होते.
भिस्तबाग येथे ज्योती गडकरी, मुख्याध्यापक शशिकांत गोरे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी स्वागत केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल ताशा, घोषणांनी स्वागत केले. अनेक मुलींनी सावित्रीचे व मुलांनी ज्योतीबा फुले यांचे वेश परिधान केले होते. भिस्तबाग ते शाळेपर्यंत मशाल मिरवणूक निघाली त्यात सर्व पाहुणे सामील झाले होते.
ज्योती गडकरी पुढे म्हणाल्या, ही शाळा श्रमिकांच्या लेकरांसाठी चालवल्या जाते हे एकूण पाहून मला खूप समाधान वाटले. सावित्री-ज्योतिबाचे कार्य या शाळेतून खर्या अर्थाने सुरू आहे. जिज्ञासा व विचारधाराने ही ज्योत सुरू करून मोठे प्रबोधनाचे कार्य सुरू केले आमच्या पिढीला जितकी सावित्रीबाई माहीत आहे, त्यापेक्षा खूप कमी प्रमाणत आजच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे. या ज्योत मिरवणुकीमध्ये ती माहिती मुलांमध्ये पोहचेल व प्रबोधन होईल.
यावेळी शाळेतील कु.समीक्षा मुत्याल. सिद्धार्थ लयचेट्टी. कु. लावण्या गाजुल यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर भाषणे केली. स्वागताध्यक्ष अनिल जावळे यांनी उत्सवाचा बाबतची माहिती व आयोजित कार्यक्रमांचा आढावा घेतला. यावेळी विठ्ठल बुलबुले म्हणाले, सावित्रीमाई व ज्योतीबा फुलेंनी बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे उघडून जागते केले. ज्या समाजाला प्रश्नच पडत नव्हते तिथे त्यांनी स्वतःला व व्यवस्थेला सवाल करण्याचे शिकवले, समाजसेवा करता करता ते मोठे उद्योग करत होते, त्यांची बांधकाम करणारी मोठी कंपनी होती.अर्थार्जन व समाज सेवा एकत्रित केली, असेही ते शेवटी म्हणाले. स्वागत व प्रस्तावना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक शशिकांत गोरे यांनी केले तर आभार काहेकर सरांनी यांनी मानले.
COMMENTS