28 डिसेंबरला देवाला लागणार हळद; अध्यक्षा शालिनी घुले पारनेर । नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक व लाखो भाविकांचे क...
पारनेर । नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील, पिंपळगांव रोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या राज्यस्तरीय ‘ब’वर्ग तिर्थक्षेत्रावर वार्षिक यात्रा महोत्सव 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान होणार असल्याची माहिती अध्यक्षा शालिनी अशोक घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे व सचिव जालिंदर खोसे यांनी दिली आहे. 3 दिवसांच्या यात्रेला 6 लाखांवर यात्रेकरु कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर येऊन देवदर्शन व तळीभंडारा करून खोबरे भांडारा उधळुन सदा आनंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने कोरठणगड दुमदुमत राहील.
दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतरच सन 2023 या नववर्षातील जिल्ह्यातील ही पहिली मोठी यात्रा असुन धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणारी लाखो भाविकांच्या भक्तीमय मांदीयाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणुन या यात्रेचे महत्व आहे. पौष पौर्णिमेला श्री खंडोबाचे म्हाळसादेवी बरोबर लग्न झाले. म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा यात्रोत्सव भरतो. 28 डिसेंबर रोजी या यात्रोत्सवाचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आले असून या दिवशी पौष षष्टीला शेकडो महिला देवाला हळद लावतात व यात्रेचे नवरात्र सुरु होते. यात्रा पूर्वनियोजसाठी प्रशासनाने सर्व विभागाला सूचना दिल्या आहेत त्यानुसार ट्रस्ट व प्रशासन करत असल्याची माहिती खजिनदार तुकाराम बाळाजी जगताप, सचिव जालिंदर महादू खोसे, सह सचिव कमलेश अर्जुन घुले, यात्रा कमिटी अध्यक्ष सुरेश पांडुरंग फापाळे यांनी दिली आहे.
शुक्रवार 6 जानेवारी पौष पौर्णिमेला पहाटे 4 वा श्री.खंडोबा देवाला मंगलस्नान पुजा, चांदिच्या सिंहासनाचे व चांदिच्या उत्सव मुर्तीचे अनावरण होईल नंतर सकाळी 6 वा अभिषेक, महापुजा, महाआरती होऊन भाविकांना यात्रेतील दर्शनासाठी मंदिरे खुले होईल. दिवसभर तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. सायंकाळी 4 वाजता श्री. कोरठण खंडोबा पालखी पिंपळगांवरोठा गावात मुक्कामी जाईल.रात्री गांवात पालखी छबीना मिरवणूक होईल.
शनिवार 7 जानेवारी रोजी स.5 वा. पासुन देवदर्शन सुरु होईल. नंतर श्री खंडोबा पालखीचे स 8वा.नवीन शाही रथातून पिंपळगांवरोठा गांवातुन प्रस्थान होऊन श्री खंडोबा मंदिराकडे पालखी सोहळा आगमनीत होईल. दिवसभर भाविकांचे तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. सायं.4 वा.सावरगांव घुले ता.संगमनेर येथून आलेल्या श्री खंडोबा मानाची पालखीची मिरवणुक व देवदर्शन कार्यक्रम मंदिराजवळ होईल. रात्री 9 वा.पर्यंत मंदिराजवळ श्री कोरठण खंडोबा देवाचा पालखी छबीना मिरवणूक होईल.
रविवार दि 8 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी 8 वा.श्री खंडोबा चांदिची पालखी आणि अळकुटी बेल्हे, कांदळी, वडगांव, माळवाडी (ता.जुन्नर), सावरगांव घुले(ता. संगमनेर) कासारे, कळस येथुन आलेल्या पालख्यांची भव्य मिरवणुक (छबीना) निघेल दुपारी 12 वा.छबीना मंदिराच्या पायर्यांवर येऊन पालख्याच्या मिरवणुकीची सांगता होईल. हा मिरवणुक सोहळा भाविकांच्या डोळ्याची पारणे फेडणारा असतो.
दुपारी 1 वा. बेल्हा व ब्राह्मणवाडा येथुन आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणुक सुरु होईल.या दोन्ही काठ्या पालखी मार्गावरुन मंदिराचे समोर पायर्यांवर आल्यानंतर तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांचे हस्ते दोन्ही काठ्यांची शासकिय महापुजा होईल. महाआरती होऊन काठ्यांचे देवदर्शन होईल त्यानंतर वाफारेवाडी, साकोरी, गारखिंडी, कळस येथुन आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक होईल. नंतर 2018 पासून येणार्या बुगेवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव सर्व काठ्यांचे देवदर्शन होऊन यात्रेची सांगता होईल.
यात्रा काळात श्री.खंडोबा मंदिर ते खंडोबा फाटा हा 1 कि.मी.रस्ता तीन दिवस दोन्ही बाजुंनी सर्व वाहनांसाठी बंद राहिल. खंडोबा फाटा व भंडारा टेकडी येथे वाहणे पार्कीग व्यवस्था आहे. आरोग्य पथक रुग्णवाहिका, अखंड विजपुरवठा, मोठा पोलीस बंदोबस्त, वायरलेस, वॉकी टॉकी, वाहतुक नियंत्रण, दंगल नियंत्रक पथक, दर्शनबारी व्यवस्था,दारुबंदि पथक,होमगार्डस,पोलिसमित्र पथक,अळकटी कॉलेज स्वयंसेवक, क्रांतीशुगर कारखाना सुरक्षा पथक, ग्रामस्थ स्वयंसेवक इ.चे चोख नियोजन व बंदोबस्त देण्यात आला आहे.
एसटी तर्फे 50 जादा यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी केलेली आहे. यात्रेच्या काळात मंदिरात तळी भरणे, नारळ फोडणे, तेल घालणेस बंदी आहे. यात्रेत दुकानदारांनी गॅस सिलेंडर वापरणेस मनाई आहे. यात्रा उत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी, पोलिस व देवस्थानाला सर्वांनी सहकार्य करावे असे निवेदन प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, डीवायएसपी अजीत पाटील, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, देवस्थानचे माजी अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, पिंपळगाव रोठा गावचे उपसरपंच व विश्वस्त दादाभाऊ पांडुरंग पुंडे, माजी सरपंच अशोक घुले, देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र भिका चौधरी, सुवर्णा अतुल घाडगे, दिलीप रामचंद्र घुले, देविदास क्षीरसागर सह सर्व माजी विश्वस्त, तसेच कोरठण पंचक्रोशी ग्रामस्थ, ग्रामपंचायत व मुंबईकर मंडळी यांनी केले आहे.
8 जानेवारीला बैलगाड्यांसाठी देवदर्शन; माजी सरपंच अशोक घुले
वार्षिक यात्रोत्सवा दरम्यान आठ डिसेंबर रोजी बैलगाड्यांसाठी देवदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 10 वाजता या घाटाचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. तर या दरम्यान पिंपरी पेंढार येथील गायमुख वाडी रहिवासी कै. विठोबा भाऊ शेलार व कै. एकनाथ विठोबा शेलार यांच्या मानाच्या बैलगाडाने या देवदर्शनास सुरुवात होणार असल्याची माहिती माजी सरपंच अशोक घुले यांनी दिली आहे.
COMMENTS