औरंगाबाद। नगर सह्याद्री - रेल्वेस्टेशनजवळील राहुलनगर परिसरात राहणारे रवींद्र भास्कर खरात (३०) सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी त्यां...
औरंगाबाद। नगर सह्याद्री -
रेल्वेस्टेशनजवळील राहुलनगर परिसरात राहणारे रवींद्र भास्कर खरात (३०) सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी त्यांच्या वडिलांच्या नावे कोर्टात हजर राहाण्याचे समन्स आल्याने ते घाबरले. पण त्यानंतर तर आणखी हादरले. कारण रविंद्र यास त्यात मृत दाखविण्यात आले होते.
पाच वर्षांपूर्वीच रवींद्रला मृत दाखवून एलआयसीच्या जयश्री विमा योजनेअंतर्गत त्याच्या नावे भरपाईचे ३० हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. रवींद्र एकटाच नाही, तर त्याच्यासारख्या ७५ असंघटित कामगारांसोबत हा प्रकार झाला आहे. या योजनेची नोडल एजन्सी म्हणून नेमलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या दलालांनी कामगारांचे खोटे मृत्यू दाखले दाखवून एलआयसीची ९७ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २०१९ मध्ये तत्कालीन एलआयसीचे वरीष्ठ अधिकारी भीमराव संपतराव सरवदे यांच्या फिर्यादीवरुन ३० एप्रिल २०१९ मध्ये वेंदात नगर पोलिस ठाण्यात कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
या फिर्यादीत साई बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, चैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, स्वाराज्य मराठवाडा कामगार संघटना, सप्तश्रुंगी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, साई श्रद्धा समाज व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था, विशाल प्रतिष्ठान सेवाभावी संस्था, जय तुळजा भवाणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांची नावे आहेत. एकूण ९९ लाख ३० हजार रुपयांचा हा अपहार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे एवढा गुन्हा नोंदवून फसवणूक झालेल्या ७४ असंघटित कामगारांना याची काही कल्पनाही नाही. आता न्यायालयाचे समन्स येण्यास सुरुवात झाल्यावर फसवणूक झाल्याचे समजले.
अशिक्षित मजुरांना सरकारी अनुदान मिळणार, असे सांगून त्यांच्याकडून कागदपत्रे गोळा केली. त्याच्या आधारे खोटे मृत्यूचे दाखले तयार करून त्यांच्या खात्यावर जमा झालेले विम्याचे प्रत्येकी ३० हजार रुपये काढून घेतले. खरात कुटुंबासोबतही अशीच फसवणूक झाली होती. संस्थेच्या कर्मचार्याने बँकेत नेऊन ३० हजार काढून घेतले आणि त्यातले ५ हजार रुपये दिल्याचे रवींद्रच्या वडिलांना आठवते. याच पद्धतीने अन्य ७४ कामगारांच्या नावे प्रत्येकी ३० हजार याप्रमाणे ९७ लाख रुपये हडप केले. रवींद्र यांचा मृत्यू वैजापूर तालुयातील भगूर येथे झाल्याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्रात जोडले. त्यावरील ग्रामपंचायतीचे शिक्के बनावट आहेत की तेथपर्यंत हा अपहार झाला होता, याचा तपास सुरू आहे.
COMMENTS