उपोषणाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले.
अहमदनगर / नगर सह्याद्री -
पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले. आज अजित पवार उपोषणस्थळी आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या बांधकामाबाबत चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही फोनवरून चर्चा केली. नितीन गडकरी यांनीही नीलेश लंके यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गडकरींचे विश्वसनीय आश्वासन मिळाल्यानंतर नीलेश लंके यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले.
अहमदनगर-पाथर्डी, कोपरगाव आणि करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती. यासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या प्रतिसादावर समाधान न झाल्याने ते गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जोपर्यंत विश्वसनीय आश्वासन देणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
दरम्यान, काल नीलेश लंके आणि त्यांच्यासोबत बसलेल्या उपोषणकर्त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळी आमदार निलेश लंके यांचे दोन किलोने वजन कमी झाल्याचे स्पष्ट झाले. आमदार लंके यांना पाठिंबा देण्यासाठी नगर तालुक्यातील करंजी, टाकळी ढोकेश्वर, पारनेर चिचोंडी पाटील, अरणगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. लंके यांची मागणी मार्गी न लागल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखी आक्रमक होण्याची शक्यता होती. मात्र आता नितीन गडकरींनी दिलेल्या आश्वासनानंतर निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतले आहे.
COMMENTS