अहमदनगर । नगर सह्याद्री सहा जणांच्या टोळीने सोमवारी पहाटे धारदार शस्त्रांसह कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, गाडळकर मळा, आगरकर मळ्यात धुमाकूळ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
सहा जणांच्या टोळीने सोमवारी पहाटे धारदार शस्त्रांसह कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, गाडळकर मळा, आगरकर मळ्यात धुमाकूळ घातला. चार ठिकाणी केलेल्या धाडसी चोरीत सुमारे 13 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदी, रोख रक्कम, बँकेचे कागदपत्रे, दुचाकी असा चार लाख 30 हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. शहरात एकाचवेळी चार ठिकाणी धाडसी दरोडा पडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी यश उमेश शेळके (वय 22 रा. विद्या कॉलनी, नगर-कल्याण रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. सुरूवातीला सहा जणांच्या टोळक्याने शेळके यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी अंजली शेळके यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. शेळके यांच्याकडील सात हजार रूपये, दीड तोळ्याचे दागिने, मोबाईल घेवून दरोडेखोर पसार झाले. जाताना त्यांनी दरवाजाची कडी बाहेरून बंद केली. शेळके कुटूंबाने आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. यानंतर कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याच चोरट्यांनी पुढे गाडळकर मळा येथे एका ठिकाणी तर आगरकर मळ्यात दोन ठिकाणी चोरी केली. गाडळकर मळ्यातील आकाश सुभाष सूर्यवंशी (वय 29) यांच्या घरी याच सहा दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने लुटले. आगरकर मळ्यात राजू गंगाधर पडाळे व वसंत रभाजी चांदणे यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, बँकेचे कागदपत्रे, दुचाकी चोरून नेली आहे.दरोडेखोरांच्या हातात धारदार शस्त्रे होती. काही ठिकाणी ते सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसत आहे. एकाच वेळी चार ठिकाणी दरोडा पडल्याने नागरिकांत घबराट आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
COMMENTS