यजमान संघाचा धुव्वा उडवित पटकाविली 19 वर्षांखालील चॅम्पियनशीप संगमनेर । नगर सह्याद्री प्रवरानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल ...
यजमान संघाचा धुव्वा उडवित पटकाविली 19 वर्षांखालील चॅम्पियनशीप
संगमनेर । नगर सह्याद्री
प्रवरानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेतील एकोणावीस वर्षांखालील मुलांच्या गटात ध्रुवच्या संघाने यजमान प्रवरा सेंट्रल स्कूलच्या संघाचा 33 विरुद्ध 13 अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवित चॅम्पियनशीप मिळवली. तर, सतरा वर्षांखालील मुलींच्या संघानेही साखळीतील प्रत्येक सामन्यात चिवटपणे झूंज देतांना विजेतेपद मिळवले.
प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने साखळी सामन्यात कोकमठाणच्या आत्मा मलिक स्कूल संघाचा अतिशय अतितटीच्या सामन्यात 13 विरुद्ध 12 अशा निसटत्या फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोपरगावच्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूलसोबत झालेल्या या सामन्यात ध्रुव ग्लोबलच्या संघाने सुरुवातीपासून आपले वर्चस्व राखतांना 20 विरुद्ध 8 अशा मोठ्या फरकाने कोपरगावचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
यजमान प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलसोबत झालेल्या अंतिम लढतीतही ध्रुवच्या संघाने सुरुवातीपासूनच आपला दबदबा निर्माण करतांना यजमान संघाला सावरण्याचीही संधी दिली नाही. जवळपास एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात बाजी मारतांना संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने प्रवरानगर संघाचा 33 विरुद्ध 13 अशा मोठ्या फरकाने पराभव करीत चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला. या संघात अंश टोकसे, हर्ष भावसार, राज दिवटे, आयुष भोत, ओम घुले, दीपक नलगे, ओम राठोड, अरहम सोनीमिंडे, लक्ष्मीनारायण बाहेती, वेदांत सोमाणी, मीत भंडारी व सार्थक छाजेड या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मुलींच्या सतरा वर्षांखालील संघानेही या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन करतांना अंतिम सामन्यात धडक दिली व विजेतेपद पटकाविले. या संघात अनुष्का जाधव, संस्कृती चोरडिया, खुशी संचेती, राशी कासट व श्रावणी अभंग यांचा सहभाग होता. तर, याच वयोगटातील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात धडक देतांना यजमान संघास कडवी झूंज दिली, मात्र ती अपयशी ठरल्याने ध्रुव ग्लोबलच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघात अंशुल गुंडाळ, कृष्णा दिवटे, संकेत देसले, वंश वाधवानी, आर्यन भाबड, पीयूष आहेर, ईशान मुंढे, अवधूत कानवडे, साहील हासे व पार्श कासवा यांचा समावेश होता.
जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत घवघवीत यश मिळवणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संघाला क्रीडा प्रशिक्षक गिरीश टोकसे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS