नाशिक : निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२२ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार नाशिक विभागा...
नाशिक : निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२२ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती उपायुक्त (सामान्य प्रशासन) उन्मेष महाजन यांनी दिली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाने २९ डिसेंबरला जाहीर केली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात निवडणूक होईपर्यंत विविध कामांना बंधने येणार आहेत. या निवडणुकीसाठी ५ जानेवारीला अधिसूचना निघणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १२ जानेवारी अखेरची मुदत आहे. १३ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १६ जानेवारी आहे.
३० जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर बरीचशी आचारसंहिता शिथील होईल, ४ फेब्रुवारीपासून या निवडणुकीसाठी जाहीर झालेली आचारसंहिता संपुष्टात आलेली असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी पूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.
COMMENTS