पुणे / नगर सहयाद्री पुण्याच्या खेड तालुक्यात एका ज्येष्ठाने स्वतःच्या मृत्युचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या ज्येष्ठ व्यक्तीने म...
पुणे / नगर सहयाद्री
पुण्याच्या खेड तालुक्यात एका ज्येष्ठाने स्वतःच्या मृत्युचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या ज्येष्ठ व्यक्तीने मित्राचं डोकं धडापासून वेगळं करुन त्याची निर्घृण हत्या केली.त्यानंतर स्वत:चे कपडे त्या मित्राच्या मृतदेहाला घातले. हा मृतदेह स्वत:चा आहे, असं भासवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.सुभाष छबन थोरवे असं ६५ वर्षीय ज्येष्ठ आरोपीचे नाव आहे.रवींद्र घेनंद असं ४८ वर्षीय हत्या केलेल्या मित्राचं नाव आहे.
सुभाष थोरवेंचे त्यांच्याच शेतात कामासाठी येणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले.याची खबर थोरवेंच्या पत्नी आणि मुलांनाही लागली होती. मुलांनी त्यांचा संसार वेगळा थाटला होता.मात्र पत्नीला हे पचनी पडत नव्हतं.यातूनच त्यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली.मात्र यातून ६५ वर्षीय सुभाष यांनी कोणताही धडा घेतला नाही.उलट या घटनेनंतर त्यांना सगळ्याचं स्वातंत्र्य मिळालं.याचाच फायदा घेत त्यांनी प्रेमसंबंध असणाऱ्या विवाहित महिलेसोबत गावापासून लांब जाऊन राहण्याचा डाव आखला.
१६ डिसेंबरच्या रात्री ९:३० वाजता ते रवींद्रना घेऊन शेतात गेले.तिथं रवींद्र यांना दारु पाजली.ते नशेत असतानाच डोक्यात कोयता घातला.मग डोकं धडापासून वेगळं केलं,स्वतःचे कपडे रवींद्रला घातले आणि ट्रॅक्टरचे राऊटर रवींद्रच्या शरीरावर घातले जेणेकरुन स्वतःचा मृत्यू अपघातातून झाला, असं सुभाष यांनी भासवलं.रवींद्र यांचं डोकं, कपडे, कोयता लगतच्या पडक्या विहिरीत पोत्यात दगड टाकून फेकून दिले अन् तिथून गायब झाला. शेतात आढळलेला मृतदेह वडिलांचा असल्याची कुटुंबियांना खात्री पटली आणि सुभाष यांची पहिली खेळी यशस्वी ठरली.अत्यविधी ही पार पडला.
अंत्यविधीच्या दोन दिवसांनंतर सुभाष आणि त्यांची प्रेयसी एकत्र भेटले.त्यांनी घडला प्रकार प्रेयसीला सांगितला आणि आता आपल्याला गावापासून लांबच राहायचं असल्याचं सांगितलं.दुसरीकडे नेहमी नशेत असणारे रवींद्र घरी न परतल्याने कुटुंबीयांनी १९ डिसेंबरला ते हरवल्याची तक्रार आळंदी पोलिसांकडे दाखल केली होती. रवींद्र आणि सुभाष मित्र असल्याचं, शिवाय ते दोघे १६ डिसेंबरच्या रात्री सोबतच असल्याचं चौकशीत समोर आलं.जर सुभाष यांचा अंत्यविधी पार पडलाय तर रवींद्र कुठे आहेत? यावरुन गावागावात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.
प्रेयसीला तिच्या गावाजवळ सोडून स्वतः बहिणीच्या गावात गेले.पण त्यांचा अवतार पाहता तिथल्या नागरिकांनी चोर समजून त्यांना चोप दिला. मग ओळख सांगताच, त्यांच्या बहिणीला समक्ष बोलवण्यात आलं. मृत पावलेला भाऊ जिवंत आहे, हे पाहून बहिणीला धक्काच बसला. ती तिथंच बेशुद्ध पडली. तिथूनच आळंदी पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली. अन् घडलेला प्रकार सर्वांसमोर आला. याप्रकरणी सुभाष थोरवेंना आळंदी पोलिसांनी अटक केलेली आहे
COMMENTS