चंद्रकांत पाटलांच्या कार्टून प्रतिमा उलट्या टांगत शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवत फाडल्या अहमदनगर । नगर सह्याद्री राज्याचे उच्...
चंद्रकांत पाटलांच्या कार्टून प्रतिमा उलट्या टांगत शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवत फाडल्या
अहमदनगर । नगर सह्याद्री
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची फुले आंबेडकर कर्मवीरांबद्दल बोलताना जीभ घसरली. त्यावर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पाटलांच्या कार्टून प्रतिमा काँग्रेस कार्यकर्त्यांनी उलट्या टांगत त्या पायदळी तुडवल्या.
महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली, अस वादग्रस्त वक्तव्य मंत्री पाटील यांनी काल पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले होते. याबद्दल महाराष्ट्रभर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. काल पाटलांच्या या वक्तव्यानंतर नगर शहरातील संतप्त झालेले काँग्रेस कार्यकर्ते काळे यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा एकत्र जमले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात यावेळी निषेधाच्या जोरदार घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला, युवकांची देखील उपस्थिती मोठी होती. चंद्रकांत पाटील यांना नगर शहरात आल्यास काँग्रेस कार्यकर्ते त्यांना नगरमध्ये फिरू देणार नाहीत, असा इशारा यावेळी काळे यांनी बोलताना दिला.
किरण काळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या दांपत्याने वेळप्रसंगी तत्कालीन काळात समाजाच्या अवहेलनेला तोंड दिले. अत्यंत संघर्षातून शिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अमुलाग्र काम केलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वटवृक्षाप्रमाणे काम केलं. हे काम करत असताना या सर्वांनी समाजाच योगदान लोकसभागासह मिळवत समाजालाही या शिक्षणाच्या यज्ञात सहभागी करून घेतलं. अशा पवित्र कार्यात सामाजिक योगदान आणि लोकसहभाग मिळवण्याच्या कामाला भीक मागितली असं म्हणत भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा अवमान करत आहे. हा अवमान मनाला अत्यंत वेदना देणारा आहे. यामुळे समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या असून पाटील यांनी नाक रगडूनच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. काळेंनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक फैयाज शेख, मुकुंद नगरचे युवा नेते शम्स खान, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, सावेडी विभागप्रमुख अभिनय गायकवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष अभिनय गायकवाड, साबीरभाई शेख, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, माजी नगरसेविका जरीना पठाण, जेष्ठ महिला नेत्या काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, ओबीसी काँग्रेस विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, महिला सरचिटणीस मिनाज सय्यद, सरचिटणीस अर्चना पाटोळे, काँग्रेस अपंग विभाग शहर जिल्हा समन्वयक सोफियान रंगरेज, संतोष जाधव, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश जाधव, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, बिभीशन चव्हाण, सचिव गणेश आपरे, शंकर जगताप, अल्पसंख्यांक ख्रिश्चन विभागाचे अजय मिसाळ, राजू साळवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS