नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या तवांगचा यंगस्ते भागात चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारतात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या जमीन बळकावण्...
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या तवांगचा यंगस्ते भागात चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारतात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या जमीन बळकावण्याच्या धोरणाचा पुढचा केंद्रबिंदू भारत असल्याचे यावरून स्पष्ट होते. कारण ९७ लाख ६ हजार ९६१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या चिनने यातील ४३ टक्के जमीन इतरांकडून बळकावली आहे.
चीनने पूर्व तुर्कस्तानवर १९४९ मध्ये कब्जा केला होता. चीन याला शिन्जियांग प्रांत संबोधतो. चीनने शिन्जियांगला स्वायत्त क्षेत्र घोषित केले आहे. २३ मे १९५० रोजी हजारो चिनी सैनिकांनी तिबेटवर हल्ला करून कब्जा केला. पूर्व तुर्कस्ताननंतर तिबेट हा चीनचा दुसरा सर्वात मोठा प्रांत आहे. १९५९ मध्ये चीनने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना अंगरक्षकांशिवाय बीजिंगला भेट देण्याचे निमंत्रण दिले, परंतु चीनने त्यांना अटक करू नये म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांना घेरले होते. पुढे दलाई लामांना भारतात आश्रय घ्यावा लागला. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धामागे हे देखील एक कारण होते.
दुसर्या महायुद्धानंतर चीनने इनर मंगोलियावर कब्जा केला. हाँगकाँग पूर्वी चीनचा भाग होता, परंतु १८४२ मध्ये ब्रिटिशांशी झालेल्या युद्धात चीनला तो गमवावा लागला. १९९७ मध्ये ब्रिटनने हाँगकाँग चीनला परत केला, पण त्यासोबत ’एक देश, दोन प्रणाली’ करार झाला. ज्या अंतर्गत चीनने हाँगकाँगला पुढील ५० वर्षांसाठी राजकीय स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. हाँगकाँगच्या लोकांना विशेष अधिकार मिळाले आहेत जे चीनच्या लोकांना नाहीत.
११ मार्च २०२० रोजी लोकसभेत दिलेल्या उत्तरात तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले होते की, लडाखचा सुमारे ३८ हजार चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात आहे. याशिवाय २ मार्च १९६३ रोजी चीन आणि पाकिस्तानमधील करारानुसार पाकिस्तानने पीओकेचा ५ हजार १८० चौरस किमी भाग चीनला दिला होता. सध्या भारताच्या जितया भागावर चीनच्या ताबा आहे, तेवढे क्षेत्रफळ स्वीत्झर्लंडचेही नाही. एकूणच चीनने भारताच्या ४३ हजार १८० चौरस किमी क्षेत्रावर कब्जा केलेला आहे, तर स्वित्झर्लंडचे क्षेत्रफळ ४१ हजार २८५ चौरस किमी आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या ९० हजार चौरस किमी क्षेत्रावर चीनचा दावा आहे.
चीन दक्षिण चीन समुद्रावरही आपला हक्क सांगत आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये असलेला हा समुद्र ३.५ दशलक्ष चौरस किमीमध्ये पसरलेला आहे. हा समुद्र इंडोनेशिया, चीन, फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेईने वेढलेला आहे. परंतु, इंडोनेशिया वगळता इतर सर्व ६ देश या समुद्रावर आपला दावा करतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत या महासागराविषयी कोणताही वाद नव्हता. पण, सुमारे ५ वर्षांपूर्वी, चीनची समुद्रात खोदकाम करणारी जहाजे विटा आणि वाळू घेऊन दक्षिण चीन समुद्रात पोहोचली. सुरुवातीला येथे एका छोट्या सागरी पट्टीवर बंदर बांधले गेले. त्यानंतर विमानांच्या लँडिंगसाठी हवाई पट्टी आणि मग काही वेळातच चीनने कृत्रिम बेट बनवून इथे लष्करी तळ बनवला.
COMMENTS