अहमदनगर । नगर सह्याद्री नगर शहरात बालकांमध्ये गोवर आजाराची लक्षणे आढळल्याने महापालिका प्रशासनाने उपाययोजनांबाबत वेगाने हालचाली सुरू केल्या ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर शहरात बालकांमध्ये गोवर आजाराची लक्षणे आढळल्याने महापालिका प्रशासनाने उपाययोजनांबाबत वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी महापालिकेत बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. महापालिकेकडून डिसेंबर व जानेवारी महिन्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
शहरात लहान मुले व बालकांमध्ये व्हायरल फ्लूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गोवर संशयित 40 बालकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दक्षतेचा भाग महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयुक्त जावळे यांनी शहरात 15 ते 25 डिसेंबर दरम्यान पहिला डोस व 15 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान दुसरा डोस अशा पद्धतीने व्यापक स्वरूपात लसीकरण अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. खासगी रुग्णालये व डॉक्टरांचेही या अभियानात सहकार्य घेण्यात येणार आहे. शहरात अंदाजे 3 ते 4 हजार लहान बालके असून, त्यादृष्टीने नियोजन करून मनपाची आरोग्य केंद्रे व इतर काही सेंटरवर लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. बोरगे यांनी सांगितले. तसेच 13 डिसेंबरपर्यंत लाभार्थी संख्येबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ड्रॉप आऊट झालेल्या बालकांनाही लस देण्यात येणार आहे.
7 ते 10 दिवसानंतर दिसतात लक्षणे
गोवर आजार विषाणूमुळे होणारा असंसर्गजन्य आजार आहे. गोवर आजाराची लक्षणे 7 ते 10 दिवसात दिसून येतात. हा आजार लसीकरणामुळे टाळता येणारा आहे. त्यामुळे 9 महिने पूर्ण झालेल्या बालकांना पहिला डोस व 16 महिने पूर्ण झालेल्या बालकांना दुसरा डोस द्यावा.
COMMENTS