(कै.) महेंद्र कुलकर्णी स्मरणार्थ पत्रकारिता पुरस्काराची घोषणा अहमदनगर । नगर सह्याद्री - महापालिकेतर्फे यावर्षीपासून ज्येष्ठ पत्रकार संपादक...
(कै.) महेंद्र कुलकर्णी स्मरणार्थ पत्रकारिता पुरस्काराची घोषणा
अहमदनगर । नगर सह्याद्री -
महापालिकेतर्फे यावर्षीपासून ज्येष्ठ पत्रकार संपादक (कै.) महेंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ पत्रकारांसाठी जीवन गौरव आणि उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख आणि मोहनीराज लहाडे. या दोघांना अनुक्रमे जीवन गौरव व उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने पत्रकारदिनी दि. ६ जानेवारीला गौरविण्यात येणार असल्याची माहिती महापौर रोहिणीताई शेंडगे आणि उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.
५१ हजार रूपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे जीवन गौरव आणि २१ हजार रूपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. संपादक (कै.) महेंद्र कुलकर्णी यांचे पत्रकारितेत मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृती कायम रहाव्यात, त्यांच्या पत्रकारितेचा आदर्श, प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांच्या नावाने हे पुरस्कार देण्यात यावेत, अशी मागणी अहमदनगर प्रेस क्लबचे शिवाजी शिर्के यांनी पत्राद्वारे महापालिकेकडे केली होती. यावर सकारात्मक निर्णय घेत यावर्षीपासून दरवर्षी हे पुरस्कार देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पुरस्कार निवड समितीमध्ये प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील, सुधीर लंके, राजेंद्र झोड, अनंत पाटील, अनिरूद्ध देवचके, संदीप रोडे यांचा समावेश आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी दरवर्षी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार निवडण्यासाठीच्या समितीमध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (कर), प्रसिद्धी अधिकारी, प्रेस क्लबचे अध्यक्ष, दोन सदस्य, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असतील. यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा महापालिकेच्या सभागृहात दि. ६ जानेवारीला होणार आहे.
COMMENTS