मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चा...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलेच वाद सुरु आहे. २०२४ मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी बावनकुळेंना खोचक टोला लगावला आहे. बावनकुळेंच्या आव्हानानंतर मी घाबरलो, मला झोप येत नाही, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला आहे.
यावर उत्तर देताना 'खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे. माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटले आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल', असं विधान बानकुळेंनी केले होते.
दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, अजित पवारांनी उपरोधिक टोला लगावला आहे. 'अरे बापरे, मला बावनकुळे यांच्या विधानानंतर झोपच येईना हो..हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावे. राजकीय संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये असा अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. सांगा त्यांना', असं अजित पवार म्हणाले आहे.
COMMENTS