अहमदनगर । नगर सह्याद्री शहरातील उपनगर परिसरात 41 ओढे व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पाईप टाकून बंद केले आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात...
अहमदनगर । नगर सह्याद्री
शहरातील उपनगर परिसरात 41 ओढे व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पाईप टाकून बंद केले आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 95 किमी लांबीच्या ओढे व नाल्यांपैकी 8.23 किमी लांबीचे प्रवाह वळविण्यात आल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत ओढे व नाले बुजविलेल्या भूखंडावर बांधकाम झालेले नाही अशा ठिकाणी तूर्तास बांधकामांना परवानगी देणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नाल्यांची रुंदी निश्चित करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.
पाईप टाकून ओढे व नाले बुजविल्यामुळे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले होते. यासंदर्भात शशिकांत चंगेडे गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी व पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नाशिकच्या कंपनीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील सुमारे 95 किमी लांबीच्या 41 ओढे व नाल्यांवर 8.23 किमीपर्यंत अतिक्रमण झालेले आहे. यात 4.91 किमी लांबीचे नाले सद्यस्थितीत मोकळ्या जागेत असून ते पाईप टाकून बुजविले आहेत. अशा जागांचे सर्वेक्षण करून तेथील मंजूर लेआउट रद्द करण्यासंदर्भात व नव्याने सुधारित लेआउट मंजूर करण्यासंदर्भात प्रक्रिया केली जाणार आहे.
तसेच 3.32 किमी लांबीच्या नाल्यांवर इमारतींचे बांधकाम झालेले आहे. यात प्राथमिक सर्वेक्षणानुसार सुमारे 368 बांधकामे आढळली आहेत. काही ओढे-नाले गाव नकाशावर असतानाही विकास योजना आराखड्यामध्ये घेण्यात आले नाहीत. याचीही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. सद्यस्थितीत ज्या भूखंडावर बांधकामे झाली नाहीत, तेथील ओढे व नाल्यांचे प्रवाह मोकळे करण्यात येणार आहेत. तसेच विकास योजना आराखड्यावर ओढे व नाल्यांची नोंद घेण्यासाठी त्याची रुंदी निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू केल्याचे जावळे यांनी सांगितले.
नवीन समिती स्थापन करणार
बुजवलेले ओढे व नाल्यांचे प्रवाह मोकळे करण्यासाठी, जेथे इमारती उभ्या आहेत, त्याबाबत पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी, तसेच ओढे व नाल्या संदर्भात प्रक्रिया करण्यासाठी नगररचना विभागात निवृत्त अधिकारी व कर्मचार्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. भविष्यातील घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असून त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी प्रशासन कार्यवाही करत असल्याचे आयुक्त डॉ. जावळे यांनी सांगितले.
COMMENTS