स्मशानभूमीसाठी जागा खरेदी ठरावावर स्पष्टीकरण अहमदनगर | नगर सह्याद्री महापालिकेच्या नया पैशाचाही चुकीचा वापर होत असेल तर तो मी होऊ देणार नाह...
स्मशानभूमीसाठी जागा खरेदी ठरावावर स्पष्टीकरण
अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेच्या नया पैशाचाही चुकीचा वापर होत असेल तर तो मी होऊ देणार नाही. दफनभूमी व स्मशानभूमीसाठी ३२ कोटींची खासगी जमीन घेण्याचा ठराव मनपा महासभेने केला असला तरी शहरातील मूलभूत प्रश्न संपल्यानंतर पैसे शिल्लक राहिल्यास भूसंपादन करा, अशी माझी भूमिका आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. मनपात गाजत असलेल्या ३२ खोके-एकदम ओके या विषयाच्या अनुषंगाने खा. विखे यांनी भूमिका मांडून मनपातील सत्ताधारी ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी व स्वतःच्या भाजप पक्षाच्या या जमीन खरेदी विषयाशी संबंधित पदाधिकारी व नगरसेवकांना सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.
महासभेत ३२ कोटीत जमीन खरेदीचा ठराव झाला असला तरी त्याचे पैसे कोणीही आता देणार नाही. प्राधान्याने शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी हे पैसे वापरले जावेत. प्रश्न सोडवल्यावर पैसे शिल्लक राहिले तर भूसंपादनासाठी पैसे वापरावेत, असे खा. विखे म्हणाले. मनपाची महासभा सर्वोच्च आहे. तिने घेतलेल्या निर्णयावर खासदार म्हणून टीकाटिपणी करणे योग्य नाही. ३२ कोटीच्या खासगी जमीन खरेदी ठरावाची पुरेशी माहिती मला नाही. पक्षानेही मला सांगितली नाही व मीही पक्षाला विचारले नाही.
पण मनपाच्या नया पैशांचाही चुकीचा वापर मी होऊ देणार नाही, असा शब्द देतो. शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पैशांचा गैरवापर होत असेल तर तो मी होऊ देणार नाही. मनपातील भाजपचे सर्व नगरसेवक स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. पण त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर तो मी निश्चित थांबवेल. त्या ठरावाची अंमलबजावणी झाली व पैसे दिले गेले तरच पक्षावर बदनामीचे शिंतोडे उडतील. मी पक्षाचा नगरचा खासदार आहे व माझीही नगर शहराबद्दल काही जबाबदारी आहे. जोपर्यंत नगर शहर खड्डे व धुळमुक्त होत नाही, तोपर्यंत हे पैसे मी इतर कामांसाठी वापरू देणार नाही, असेही खा. विखे यांनी स्पष्ट केले.
COMMENTS