७० वी वरिष्ठ पुरुष व महिला राज्य अजिंयपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा अहमदनगर | नगर सह्याद्री मुंबई शहर, पुणे, रायगड, कोल्हापूर यांनी ७० व्या ...
७० वी वरिष्ठ पुरुष व महिला राज्य अजिंयपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
अहमदनगर | नगर सह्याद्री
मुंबई शहर, पुणे, रायगड, कोल्हापूर यांनी ७० व्या वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंयपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत दुसरा विजय मिळवीत महिला गटात बाद फेरी गाठली आहे. पुरुषांत अहमदगर, नांदेड, मुंबई शहर यांनीही बाद फेरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनच्या विद्यमाने नगरच्या वाडिया पार्क मैदानावर मॅटवर सुरू असलेल्या महिलांच्या इ गटात कोल्हापुरने नांदेडला ३४-२८ असे नमवित आगेकूच केली. तेजस्वीनी नार्वेकर, स्नेहा शिंदे, दीपाली पुजारी यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. नांदेडच्या पूजा अडलिंगे, पल्लवी साळुंके यांचा खेळ संघाला विजयी करण्यात कमी पडला. मुंबई शहरने ब गटात दुसरा विजय मिळविताना धुळ्याला ५५-१८ असे लीलया पराभूत केले. मेघा कदम, पूजा यादव यांच्या झंजावाती चढाया त्याला पौर्णिमा जेधेची मिळलेली पकडीची साथ यामुळे मुंबईने गुणांचे अर्धशतक पार केले.
रायगडने महिलांच्या फ गटात सांगलीला २४-२१ असे चकवीत आगेकूच सुरू ठेवली. अत्यंत चुरशीच्या या सामन्यातील पहिल्या डावात रायगड ०९-१२ अशा ३ गुणांनी पिछाडीवर होते. उत्तरार्धात ही कसर भरून काढत रायगडने ३ गुणांनी सामना आपल्या बाजूने झुकविला. रचना म्हात्रे, ऋचा भगत यांच्या चतुरस्त्र खेळाला विजयाचे श्रेय जाते. सांगलीच्या शिवराजांनी पाटील, श्रद्धा माळी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली. सिंधुदुर्गने फ गटात जळगांवला ३७-३६ असे चकवीत पहिला विजय साकारला. मध्यांतरातील १९-२७ अशा ८ गुणांच्या पिछाडीवरून ही किमया साधली. लक्ष्मी सरोषा, साक्षी मस्के यांच्या झुंजार खेळाला विजयाचे श्रेय जाते. वैष्णवी रत्नपारखी, तेजस्वीनी परदेशी यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला.
नांदेडने पुरुषांत धुळ्याला ४९-३७ असे चीत करीत आगेकूच केली. अक्षय जाधव नांदेडकडून तर महेंद्र रजपूत धुळ्याकडून उत्कृष्ट खेळले. ठाण्याने फ गटात परेश हरड, उमेश म्हात्रे यांच्या उत्तम खेळाच्या जोरावर सिंधुदुर्गला ४३-२१ असे नमविले. लातूरने उस्मानाबादला ३६-३० असे पराभूत केले. रात्री उशीरा झालेल्या अ गटातील पुरुषांच्या चुरशीच्या सामन्यात यजमान अहमदनगरने मध्यांतरातील ११-१२ अशा पिछाडीवरून कोल्हापूरचा ३२-२६ असा पराभव करीत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले. आदित्य शिंदे, सौरभ राऊत, शंकर गदई यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. तुषार पाटील, तेजस पाटील या कोल्हापूरच्या युवा खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली.
प्रथमेश साळवीने उत्तम पकडी करीत त्यांना साथ दिली. पुरुषांच्या क गटात मुंबई उपनगरने परभणीला २८-२२ असे पराभूत केले. विश्रांतीत ११-१२ अशा पिछाडीवर पडलेल्या उपनगरने विश्रांतीनंतर मात्र टॉप गिअर टाकत हा सामना खिशात टाकला. आकाश गायकवाड, अभिषेक नर यांच्या अष्टपैलू खेळाने उपनगरने विजय साकारला. राहुल धांदगे, पंकज राऊत यांनी परभणीकडून शर्थीची लढत दिली. मुंबई शहरने ब गटात दुसरा विजय साकारताना सांगलीला ५१-२३ असे सहज नमवित बाद फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा केला. प्रणय राणे, सुशांत साईल, संकेत सावंत, हर्ष लाड याचा चढाई पकडीचा खेळ विजयात महत्वाचा ठरला.
महिलांच्या क गटात नाशिकने मुंबई उपनगरला २४-२३ असे चकवीत कबड्डी रसिकांना आश्चर्याचा धक्का दिला. ज्योती पवार, पूजा कुमावत, मालती गांगुर्डे यांच्या चतुरस्त्र खेळाला विजयाचे श्रेय जाते. शुभदा खोत, सायली जाधव, राधिका सिंग यांचा खेळ उपनगरचा पराभव टाळण्यात कमी पडला. महिलांच्या इ गटात नांदेडने बीडला ४९-४७ असे नमवित पहिल्या विजयाची नोंद केली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ठरलेल्या या सामन्यात नांदेडने दोन गुणांनी बाजी मारली. पल्लवी सुंभें, हर्षदा भवर, सविता शिंदे यांचा खेळ महत्त्वाचा ठरला. पूजा अडलिंगे, पल्लवी साळुंखे, वैष्णवी पडवळ यांच्या खेळाने सामन्यात चुरस निर्माण केली.
COMMENTS