अहमदनगर | नगर सह्याद्री आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी व व्यवसायात भरभराटीसाठी आध्यात्मिक ज्ञान असल्याचे अमिष दाखवून येथील एका व्यवसायिका...
अहमदनगर | नगर सह्याद्री
आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी व व्यवसायात भरभराटीसाठी आध्यात्मिक ज्ञान असल्याचे अमिष दाखवून येथील एका व्यवसायिकाची २३ लाख ४३ हजार ५०० रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गणेश पोपट लोंढे (वय ३२ रा. गजानननगर, लोंढे मळा, केडगाव) असे फसवणूक झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरच्या मामा-भाच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय तबाजी काळे (रा. कुरणरोड, संगमनेर), त्याचा भाचा महेश विश्वास मोरे (रा. पठार भाग, घारगाव, ता. संगमनेर), गुरू प्रभाकर ढवळु डंबाळी, गुरूमाऊली पारूबाई प्रभाकर डंबाळी (दोघे रा. साकरे ता. विक्रमगड, जि. पालघर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश लोंढे यांचे केडगावमध्ये फर्निचरचे दुकान आहे. त्यांची व्यवसायानिमित्त सन २०१५ मध्ये विजय तबाजी काळे व त्याचा भाचा महेश विश्वास मोरे याच्याशी ओळख झाली होती.
त्या दोघांनीही गणेशला सांगीतले की, आमच्याकडे आध्यात्मिक ज्ञान असून आम्ही तुमच्या आयुष्यात भरभराट आणू शकतो. आम्ही आमचे गुरू व गुरू माऊलीकडुन हे ज्ञान प्राप्त केले असून ज्ञानाच्या आधारे आम्ही तुमची प्रगती करून देवू शकतो.’ जुलै २०१९ मध्ये विजय काळे व महेश मोरे यांनी, तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी तुम्हाला आमचे गुरू व गुरू माऊली यांना बोलावून घेऊन तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी सांगून त्यावर उपाय करावा लागेल, त्यासाठी मोठा खर्च करावा लागेल,’ असे सांगीतले. त्यामुळे गणेशने त्यांच्यावर विश्वास ठेवून गुरू व गुरूमाऊली यांना बोलावून घेण्यास सांगीतले. दरम्यान त्यासाठी विजय व महेश यांनी गणेश यांना पाच लाख ५१ हजार रूपये खर्च सांगितला होता.
३० ऑगस्ट २०१९ ला विजय व महेश यांनी एक पुरूष व एक महिला गणेशच्या घरी आणली. त्यांची नावे गुरू प्रभाकर ढवळु डंबाळी, गुरूमाऊली पारूबाई प्रभाकर डंबाळी, असे सांगितले. चौघांनीही गणेशच्या घराची परिस्थिती पाहुन तुम्हाला जीवनात खूप अडचणी आहेत, त्या आम्ही सोडवु शकतो, परंतु त्या साठी तुम्हाला खर्च करून तुमची सुटका करून घ्यावी लागेल, असे सांगीतले होते.
विश्वास ठेवुन गणेशने त्यांना वेळोवेळी २३ लाख ४३ हजार रूपयांची रक्कम दिली. २२ डिसेंबर २०२२ रोजी महेश मोरे, गुरू व गुरूमाऊली हे तिघेजण गणेशच्या घरी आले. त्यांना म्हणाले, तुम्ही मला अजून पाच लाख ५१ हजार रूपये द्या, तुमची उरलेल्या सर्व अडीअडचणी संपवून टाकतो.’ त्यावेळी गणेश यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली व उलट तुम्ही माझे अगोदर दिलेले २३ लाख ४३ हजार ५०० रूपये मला परत द्या, अशी मागणी केली. तेव्हा त्यांनी मला, तू जर पैसे दिले नाही तर तुमच्या कुटुंबाच नुकसान करून टाकू, अशी धमकी देवून निघून गेले. फसवणुक झाल्याचे गणेश यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी २७ डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
COMMENTS