बारामती / नगर सहयाद्री अब्दुल सत्तार यांची गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी राजीनाम्याची मागणी होत असतांना दुसरीकडे त्यांच्या मुलीच्या टीईटी घोट...
बारामती / नगर सहयाद्री
अब्दुल सत्तार यांची गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी राजीनाम्याची मागणी होत असतांना दुसरीकडे त्यांच्या मुलीच्या टीईटी घोटाळ्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मिळवलेल्या माहितीत धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा नितीन यादव यांनी केला आहे.त्यामुळे नितीन यांच्या दाव्यानुसार अब्दुल सत्तार यांची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
टीईटी प्रमाणपत्र नसताना अब्दुल सत्तार यांच्या मुलीला सेवेत कायम कसे केले? असा सवाल उपस्थित करत नितीन यादव यांनी सत्तार यांच्यावर विविध आरोप केले आहेत. हिना कौसर यांचे टीईटी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. हिना यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जन्मतारखा असतांना हा त्यांना सेवेत रुजू करण्यात आल्याचे यादव यांनी म्हंटलं आहे. दुसऱ्या कन्येची माहितीच उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाचे पत्र नितीन यादव यांना प्राप्त झाले आहे.
बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात सत्तार यांच्या मुलीच्या टीईटी प्रमाणपत्रबाबत माहिती मागवली होती.मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुनच या नेमणुका झाल्या का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.
बारामती येथील नितीन यादव यांना माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ करण्यासाठी महत्वाची ठरू शकते.
COMMENTS