सुपा / नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहती मधील वाढती गुंडगिरी ठेकेदारीतील वाद आणि समाज कंटकांचा प्रचंड त्रास अशा आशया...
सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहती मधील वाढती गुंडगिरी ठेकेदारीतील वाद आणि समाज कंटकांचा प्रचंड त्रास अशा आशयाच्या बातम्या नुकत्याच काही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तालुक्यात येणारी गुंतवणूक स्थानिक गुंडागर्दीमुळे, हप्ते खोरी मुळे, जर बाहेर जात असेल तर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही बाब लांच्छनास्पद आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे तरुणांचे तयार झालेले ग्रुप, संघटना, प्रतिष्ठान अशा स्वरूपाची संघटित दादागिरी सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये वाढीस लागलेली असल्याने उद्योगधंद्यांच्या विकासावर पर्यायाने परिसराच्या विकासावर याचा गंभीर परिणाम होत आहे. हि परिस्थिती कायम अशीच राहिली तर छोट्या गुंतवणूकदारापासून मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत सर्वांनाच याचा फटका बसणार आहे. सोबत जोडलेल्या बातमीनुसार ज्या व्यक्ती संघटना प्रतिष्ठान ग्रुप सुपा औद्योगिक परिसरामध्ये उद्योजकांमध्ये दहशत पसरवत असतील, अशा सर्व संघटनांवर स्थानिक पोलीस प्रशासन, मा. जिल्हाधिकारी साहेब आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांनी योग्य तो समन्वय करून तातडीने रॅपिड ऍक्शन फोर्स लावून सुपा औद्योगिक वसाहती मध्ये विनाकारण फिरणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी प्रशासनाकडे भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त ज्या कंपन्या सुपा औद्योगिक वसाहती मधून स्थलांतरित झाल्या आहेत किंवा बातमीनुसार तोशिबा किंव्हा मिंडा सारख्या प्रतिष्ठित कंपनी आपला प्रकल्प स्थलांतरित करीत आहे. त्याविषयीच्या कारणांची योग्य ती चौकशी करून याची कारण मिमांसा जनतेसमोर आली पाहिजे.
यासाठी प्रशासनाला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका पूर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या सर्व अपप्रवृत्तींवर कारवाई न झाल्यास समाजातील विविध घटकांशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील अशा इशारा पारनेर तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकार्यानी दिला आहे. यावेळी भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुका अध्यक्ष वसंत चेडे , सुजित झावरे , सुभाष दुधाडे , राहुल शिंदे , सुनिल थोरात , योगेश रोकडे दत्तात्रय पवार , सागर मैड, मनोज मुंगसे ,अमोल मैड यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS