साद पडसाद / सुहास देशपांडे ‘नेमेचि येतो पावसाळा’ या युक्तीप्रमाणे महापालिकेत काही कारवाया सुरू असतात. या कारवाया देखील आता सिझनल झाल्या ...
साद पडसाद / सुहास देशपांडे
‘नेमेचि येतो पावसाळा’ या युक्तीप्रमाणे महापालिकेत काही कारवाया सुरू असतात. या कारवाया देखील आता सिझनल झाल्या आहेत. त्याचा फारसा परिणाम ना कर्मचार्यांवर होतो ना बेकायदेशीर वागणार्यांवर होतो. कार्यालयात कार्यालयीन वेळेत न येणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सुरू केलेली मोहीम त्यापैकीच एक म्हणावी लागेल.
दैनंदीन कामासोबतच स्वच्छतेबाबतच्या गंभीर समस्या सुटाव्यात यासाठी महापालिकेत सर्वसामान्य माणूस जातो. पूर्वीच्या काळात ‘कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये’ असे म्हटले जायचे. असाच काहीसा प्रकार महापालिकेबाबतही झाला आहे. एखादे नियमानुसार असलेले काम मार्गी लावण्यासाठीही नागरिकांना महापालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. आलेल्या नागरिकाचे काम मार्गी लावण्याबाबत असलेली अनुत्सुकता याबरोबरच कार्यालयीन वेळेतही जागेवर नसणारे कर्मचारी, हे यास कारणीभूत असते. सकाळी पावणे दहा ते सायंकाळी पावणे सहा ही शासकीय कार्यालयांची वेळ असते. वास्तविक या वेळेत नियमित येणारे आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कामकाज करत बसणारे कर्मचारी विविध शासकीय कार्यालयात असतात, मात्र त्यांची संख्या मोजकीच आहे. इतर मात्र सकाळी अकरापर्यंत निवांत येतात, एखादा तास झाला की चहाच्या नावाखाली खुर्ची सोडतात, चहाच्या गाडीवर किंवा टपरीवर गप्पा-टप्पा झोडतात आणि मग पुन्हा आपल्या खुर्चीकडे वळतात.
एखाद-दुसरे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात (बर्याचवेळा अर्धवट काम ठेवतात) तोच जेवणाची वेळ होते. गाडीला किक मारून घरचा रस्ता धरून जेवण, वामकुक्षी वगैरे झाल्यानंतर कार्यालयाच्या दिशेने निघतात. काही तर दुपारनंतर येतीलच, याची शाश्वती नसते. त्यांचे कार्यालयीन सहकारी देखील हे मान्य करतात. ‘जेवायला गेल्यानंतर संबंधित कर्मचारी परत येईल का आणि येणार असेल तर कधी येईल हे सांगता येणार नाही‘ असे ते कामानिमित्त आलेल्या नागरिकांना स्पष्टपणे सांगतात.
महापालिकेत तर हे नेहमीचेच झाले आहे. आजपर्यंत अनेक आयुक्त, उपायुक्तांनी अशा ‘लेट लतिफांना’ धडा शिकविण्यासाठी मोहिमा केल्या, मात्र त्यातून फारसे काही साध्य झाले नाही. महापालिका इमारतीसमोर असलेल्या चहाच्या गाड्या, टपर्या येथे दिवसभर महापालिकेचे ठराविक कर्मचारी रेंगाळत असल्याचे चित्र सातत्याने दिसते. काही कर्मचार्यांना भेटायचे असेल तर याच ठिकाणाचा पत्ता दिला जातो. अर्थात यात अनेकदा वेगळ्या ‘भेटी’ असतात, पण हे वास्तव आहे. विशेषतः नगररचना, बांधकाम, आरोग्य या विभागात लेट लतीफ आणि कामचुकारांची संख्या अधिक असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी या कर्मचार्यांना काडीचाही फरक पडत नाही. वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर ते बसलेले असतात. त्यांची नावे कधीच बदल्यांची यादीत नसतात. यातील एखाद-दुसर्याची बदली करण्याचे धाडस प्रशासनाने दाखविलेच तर ते फार काळ टिकत नाही. याची माहिती संबंधित कर्मचार्यांनाही असल्याने ते कोणालाच भीक घालत नाहीत. त्यांच्यावर वरदहस्त असलेले दुखावणार नाहीत, याची काळजी मात्र ते घेत असतात. त्यांच्यासाठी कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही ते कार्यालयात येऊन त्यांची कामे मार्गी लावतात. त्याच्यासाठी कागदांवर सह्या आणण्यासाठी फाईली घेऊन तासंतास वरिष्ठ अधिकार्यांच्या घराबाहेर हे कर्मचारी बसलेले असतात. हा सगळा प्रकार ‘हितसंबंधांचा’ असल्याने त्यांचे फावते.
‘लेट लतिफांना’ झटका देण्यासाठी आयुक्त जावळे यांनी सुरू केलेली ही मोहीम देखील यापूर्वीच्या मोहिमांप्रमाणेच अल्पजिवी ठरण्याची शक्यता त्यामुळेच अधिक आहे. अशा प्रकारच्या मोहिमा पूर्णपणे यशस्वी होण्यात आणि कर्मचार्यांना बेशिस्तीपासून दूर करण्यात सर्वात मोठी अडचण असते ती पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी संघटनेची. त्यामुळे आयुक्तांनी अशा मोहिमा सुरू करण्यापूर्वी या सर्वांची परवानगी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. महापालिकेतील बहुतांश कर्मचार्यांचे कोणा ना कोणासोबत लागेबांधे आहेत. आपल्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण जरी त्यांना लागली तरी ते लगेच पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी संघटना यापैकी कोणाला तरी हाताशी धरून कारवाईचे आदेश निघणार नाहीत, याची तजवीज करतात. या उपरही आदेश निघालेच तर त्याची अंमलबजावणी होणार नाही, यासाठी ते पूर्णपणे ताकद लावतात. विशेष म्हणजे कारवाईचे आदेश काढणारे वरिष्ठ अधिकारीही यास बळी पडून कारवाईची फाईल कायमची बंद करतात. हे सातत्याने चालत असल्याने लेट लतिफ पूर्णतः निर्ढावले आहेत.
लेट लतीफ फक्त महापालिकेच्या मुख्य कार्यालयातच नाही. उलट यापेक्षा अधिक संघ्या प्रभाग समिती कार्यालये आणि उपकार्यालयांत आहे. प्रभाग समिती एक, दोन, तीन आणि चार या प्रमाणेच नागापूर, केडगाव अशा उपकार्यालयात कर्मचारी जागेवर नसतात, अशा तक्रारी भरमसाठ असतात. येथे प्रभाग अधिकार्याला सांभाळले की ‘देव पावला’ असे म्हटले जाते. वरिष्ठ अधिकारी प्रभाग समिती कार्यालयांना वारंवार भेटीे देत नसल्याने प्रभाग अधिकार्यांपासून शिपायांपर्यंत कोणावरच कोणाचे बंधन नसते. त्यामुळे एखादा नवीन आयुक्त आल्यानंतर अशा कारवाया होतच असतात, असे समजून लेट लतिफ अशा मोहिमांना भीक घालत नाहीत. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे ऋतू येतात आणि जातात, तसेच अशा मोहिमा हाती घेतल्या जातात आणि संपुष्टात येतात. यातून फक्त मोहिमांचे आदेश देणार्या अधिकार्यांना प्रसिद्धी मिळते, एवढेच.
COMMENTS