पारनेर । नगर सह्याद्री तालुक्यातील देसवडे येथील रहिवासी संजीव भोर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी यांची नियु...
पारनेर । नगर सह्याद्री
तालुक्यातील देसवडे येथील रहिवासी संजीव भोर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील 20 वर्षांपासून नगर जिल्हा व राज्याच्या सामाजिक क्षेत्रात लढवय्ये नेतृत्व म्हणून संजीव भोर यांचे नाव सर्वश्रुत आहे. शेतकर्यांचे प्रश्न असो की समाजातील सर्वसामान्य गरीब,वंचित घटकांवरील अन्यायाविरोधात संजीव भोर यांनी अग्रभागी राहून सातत्यपूर्ण संघर्ष केला आहे. शेतकरी संप आंदोलनात व कोपर्डी अत्याचार घटनेच्या विरोधात भोर यांनी दिलेला लढा ही त्यातलीच प्रमुख उदाहरणे आहेत.
संजीव भोर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ते आहेत. याबरोबरच आता त्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेवरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार संजीव भोर यांच्या नियुक्तीचा आदेश निर्गमित केला आहे. समाजकारणात सक्रिय असले तरी संजीव भोर स्वतः अनेक वर्षांपासून प्रायोगिक शेती करणारे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत. नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पन्न वाढवण्याबाबत ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत.
संजीव भोर यांच्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील व समाजकारणातील योगदानाची नोंद घेऊन मुख्यमंत्री शिंदे व कृषिमंत्री सत्तार यांनी भोर यांची विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सदस्य पदी नियुक्ती करून एक प्रकारे त्यांना सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी पूरक व शेतकर्यांसाठी सर्वोत्तम योगदान देण्याचाही प्रयत्न करून मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांच्या विश्वासास पात्र ठरू अशी प्रतिक्रिया संजीव भोर यांनी आपल्या निवडी बाबत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
COMMENTS