ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार पोहोचला शिगेला! । मतदाराला खूष करण्यासाठी नवनवीन युक्त्या सुनिल चोभे । नगर सह्याद्री - जिल्ह्यातील ग्रामपं...
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार पोहोचला शिगेला! । मतदाराला खूष करण्यासाठी नवनवीन युक्त्या
सुनिल चोभे । नगर सह्याद्री -
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी रविवारी (दि. 18 डिसेंबर) मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मातब्बर नेत्यांचा कस लागला आहे. दरम्यान, गावातील प्रत्येक गटाचे कार्यकर्ते सरपंच पदावर आपलाच दावा ठोकत आहेत. गावचा कारभार मतदार कोणाच्या हाती देणार हे 20 डिसेंबरला स्पष्ट होईल.
जिल्ह्यात 203 ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून त्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अनेक गावांत उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दोन गटांत वाद झाले. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर गावातील दोन्ही, तीन्ही गटांकडून प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. नारळ वाढवत आम्ही त्यांच्यापेक्षा कसे जास्त काम केले आणि पुढच्या पाच वर्षात काय करणार, याचा लेखाजोखा मांडला. अनेकांनी भाषणे ठोकत विरोधकांचा समाचार घेतला. अनेक गावांत जाहीरनामा प्रकाशित केले असून त्यातून गावच्या विकासाचे व्हिजन मतदारांसमोर मांडले आहे. अखेरच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार पोहोचला असल्याने उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरु आहे. मतदारांना खूष करण्यासाठी नवनवीन युक्त्या आजमावल्या जात आहेत.
मतदान तुम्हालाच, फक्त विश्वास ठेवा!
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मतदाराला खूष करण्यासाठी गावातील दोन्ही गटाकडून लक्ष्मी दर्शन केले जात आहे. हॉटेल्स व ढाब्यावरील जेवणावळी हाऊसफूल्ल झाल्या आहेत. दोन्ही गटांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन होत असल्याने मतदान द्यायचे कोणाला, हा प्रश्न मतदारांसमोर आहे. दरम्यान, प्रत्येक उमेदवाराला ‘मतदान तुम्हालाच, फक्त विश्वास ठेवा’ असे सांगून मोठ्या आशेने ‘वाट’ लावत आहेत. सर्वच उमेदवाराला मतदार आश्वासन देत असल्याने उमेदवारही संभ्रमावस्थेत आहेत.
सोशल मीडीयाचा खुबीने वापर
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारांच्या साठमारीत अनेकांच्या गुडघ्याचे बाशिंग सुटले. गाव पुढार्यांकडून पुढच्या निवडणुकीचा शब्द देण्यात आला. काहींची आरक्षणात अडचण झाली. भावी सरपंच, भावी मेंबर अशा आशयाच्या पोस्ट अनेकांच्या झळकत असून आम्हीच गावाचा विकास करणार असल्याचा छातीठोक दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच आरोपाला प्रतिउत्तर देत सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे.
सत्ताधारी-विरोधकांकडून सरपंचपदावर दावा
गेल्या पाच वर्षात आम्ही कसा कारभार केला आणि पुढील पाच वर्षात काय कामे करणार, याचा लेखाजोखा सत्ताधारी मतदारांसमोर मांडत आहेत. विरोधकांकडून सत्ताधार्यांनी केलेल्या चुकीच्या कामांचा भांडाफोड करण्याचे काम सुरु आहे. सध्याच्या सत्ताधार्यांपेक्षा आम्हीच पुढच्या पाच वर्षात गावाचा विकास करणार असल्याचे विरोधक सांगत आहेत. दोन्ही गटाकडून आगामी सरपंचपदावर दावा सांगितला जात आहे.
COMMENTS