नवी दिल्ली । वृत्तसंस्था कोरोना महासाथीच्या काळात बहुतांश विषाणूजन्य आजारांचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे दिसून आले. मात्र, कोरोना महामारी ...
नवी दिल्ली । वृत्तसंस्था
कोरोना महासाथीच्या काळात बहुतांश विषाणूजन्य आजारांचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे दिसून आले. मात्र, कोरोना महामारी धोक्याच्या सर्वोच्च पातळीवर असतानाही मलेरिया आजाराचे प्रमाण नियमित राहिल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक मलेरिया अहवालातून समोर आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी वार्षिक मलेरिया अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये मलेरिया आजारामुळे सहा लाख 19 हजार मृत्यू झाल्याची नोंद जागतिक स्तरावर करण्यात आली आहे. 2020 मध्ये ही संख्या सुमारे सहा लाख 25 हजार एवढी होती. मृत्यूच्या संख्येत घट दिसत असली तरी डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांप्रमाणे संसर्ग होण्याचे प्रमाण घटल्याचे चित्र मलेरियाबाबत दिसलेले नाही.
ही बाब चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोना काळात जगभर लादलेले प्रतिबंधात्मक निर्बंध, त्यातून नागरिकांच्या एकत्र येण्यावर आलेल्या मर्यादा अशा अनेक कारणांमुळे सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांच्या संसर्गाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याचे दिसून आले.
एका विषाणूचा प्रभावी अंमल असताना इतर विषाणूंच्या प्रसाराची ताकद काहीशी सौम्य होत असल्याचेही यावेळी विविध तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, कोरोना महासाथीची तीव्रता अधिक असण्याच्या काळातही मलेरिया संसर्गाचे प्रमाण कायम राहणे याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
COMMENTS