भाजपला लक्ष्य केल्याचा दावा अहमदनगर । नगर सह्याद्री - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोणी करू नये व कोणाची तशी हिंमतही होऊ नये. मागच्या ...
भाजपला लक्ष्य केल्याचा दावा
अहमदनगर । नगर सह्याद्री -
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोणी करू नये व कोणाची तशी हिंमतही होऊ नये. मागच्या पिढीतही कोणात अशी हिंमत नव्हती व पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोणी करू नये व कोणाची तशी हिंमतही होऊ नये, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, व्हीडीओ काटकूट करून व काही व्हीडीओ चुकीच्या पद्धतीने दाखवण्यातून केवळ भाजपला बदनाम करण्याचे, काऊंटर करण्याचे व क्रिटीसाईज करण्याचे काम सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
नगर तालुक्यातील खासगी कार्यक्रमासाठी बावनकुळे नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून वाद रंगला असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबाबत भाष्य करून त्यात भर घातली. यामुळे विरोधकांनी टीका केली.
भाजपची अडचण झाल्यानंतर अखेर आमदार लाड यांनी वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर लाड यांच्या वक्तव्यावरून बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच आपले वक्तव्य चुकले असल्याचेही लाड यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याकडे लक्ष वेधले असता सध्या व्हिडिओ काटछाट करून व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरू आहे, असे ते म्हणाले. भाजपचे 100 टक्के कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानूनच काम करतात. देशातील 18 कोटी व महाराष्ट्रातील अडीच कोटी भाजप कार्यकर्ते छत्रपती शिवरायांची प्रेरणा, ऊर्जा व इतिहास घेऊन काम करतात, असा दावा बावनकुळे यांनी केला.
COMMENTS