अहमदनगर | नगर सह्याद्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत महा...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत महापौर व शहरप्रमुखांच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडला. महापालिकेतील ३२ कोटी रुपयांच्या जागा खरेदीवरून पक्षावर शिंतोडे उडवले जात आहेत, महापालिकेत सत्ता असूनही कामे होत नाहीत, मनपा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारच चालवतात. शहरप्रमुख विश्वासात घेत नाहीत, पदाधिकारी बदला, यापुढे नगरमध्ये महाविकास आघाडी नको आदी भावना पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या. बंद खोलीत खडाजंगीही उडाली.
सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पक्षाचे संपर्कप्रमुख आमदार शिंदे नगरमध्ये आढावा घेण्यासाठी आले होते. सरकारी विश्रामगृहावर त्यांनी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पदाधिकारी, शहरातील पदाधिकारी व महापालिकेतील पदाधिकार्यांची स्वतंत्र बैठका घेतल्या. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे, महापौर रोहिणी शेंडगे व संजय शेंडगे, शहर प्रमुख संभाजी कदम, युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव व संदेश कार्ले, अशोक गायकवाड, आशा निंबाळकर, स्मिता आष्टेकर यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेनेचा महापौर असूनही मनपामध्ये कामे होत नाहीत, राष्ट्रवादीचे आमदारच मनपा चालवतात. शहरात रस्ते नाहीत, पाणी मिळत नसेल तर पक्षाची सत्ता असूनही त्याविरोधात आंदोलन करावे लागेल. सावेडी उपनगरात स्मशानभूमी व दफन भूमीसाठी ३२ कोटी रुपयांची जागा खरेदीचा घाट घातला जात आहे. त्यामध्ये पक्षावर शिंतोडे उडवले जात आहेत. पक्षाबद्दल संशय घेतला जात आहे. निष्क्रिय पदाधिकार्यांना बदला. बंद खोलीत भाजप खासदार व राष्ट्रवादीच्या आमदारांबद्दल पक्षाचे पदाधिकारी बोलतात परंतु जाहीरपणे कोणी त्यांच्या विरोधात वक्तव्य करत नाहीत, असेही म्हणणे विविध पदाधिकार्यांनी आमदार शिंदे यांच्याकडे मांडली.
COMMENTS