उपकार्यकारी अभियंता कोपनर यांची तोफखाना पोलिसांत फिर्याद अहमदनगर । नगर सह्याद्री लाचलुचपतच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी महावितरणच्या न...
उपकार्यकारी अभियंता कोपनर यांची तोफखाना पोलिसांत फिर्याद
अहमदनगर । नगर सह्याद्री
लाचलुचपतच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी महावितरणच्या नगर ग्रामीण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता किसन भीमराव कोपनर (वय 42 रा. शिलाविहार, सावेडी) यांना दोघांनी दोन लाख रूपये खंडणी मागितली. जानेवारी 2022 मध्ये ही घटना घडली असून यासंदर्भात 13 डिसेंबरला तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांढरीपूल येथील हॉटेल लिलियम पार्कचे मालक सुरेश विठ्ठलराव शेटे (रा. अर्बन बँक कॉलनी, सावेडी) व नवनाथ हरिश्चंद्र ईसारवडे (रा. गदेवाडी ता. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जुलै 2018 मध्ये महावितरणच्या नगर ग्रामीण उपविभागीय कार्यालयाने सुरेश शेटे याच्या हॉटेल लिलियम पार्कवर वीज चोरीबद्दल कारवाई केली होती. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2021 रोजी सुरेश शेटे याच्या मालकीच्या लिलियम पार्क हॉटेल येथे भरारी पथकाने कारवाई केली होती. वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे कारवाईत आढल्याने त्याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने शेटे याला सहा लाख 90 हजार रूपये निर्धारक देयक दिले होते. परंतु दंडाची रक्कम न भरता शेटे याने 3 जानेवारी 2022 रोजी हस्तकामार्फत खोसपुरी (ता. नगर) येथील वरिष्ठ तंत्रज्ज्ञ टिमकरे व भिसे यांच्याविरूद्ध लाचलचुपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर 4 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या घरी असताना नवनाथ ईसरवाडे याने फोनव्दारे तसेच व्हॉट्सअप कॉल करून दोन लाख रूपये खंडणी मागितली.
दरम्यान फिर्यादी कोपनर यांनी खंडणीची पूर्तता न केल्यामुळे 22 जानेवारी 2022 रोजी त्यांच्याविरूद्ध ज्ञानेश्वर ग्यानोजी सोनवणे (रा. दरेवाडी ता. नगर) यांच्यामार्फत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ अधिकारी असून माझी जनमानसात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करून खंडणी मागितल्याने शेटे व ईसरवाडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS