क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीची मागणी अहमदनगर । नगर सह्याद्री शहरातील माळीवाडा येथे उभारण्यात येणार्या महा...
क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीची मागणी
अहमदनगर । नगर सह्याद्री
शहरातील माळीवाडा येथे उभारण्यात येणार्या महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुर्णाकृती पुतळा महात्मा फुले यांच्या जयंती पूर्वी उभारण्याची मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, पंडित खरपुडे, अमित खामकर, भरत गारुडकर, दिपक खेडकर, मळू गाडळकर, उमेश धोंडे, जय लोखंडे, आशिष भगत, किरण जावळे, जालिंदर बोरुडे, आनंद पुंड आदी उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याबाबत त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर रोहिणीताई शेंडगे व आमदार संग्राम जगताप यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या जयंतीपूर्वी उभारण्याची घोषणा केली. या घोषणेचा व निर्णयाचा कृती समितीच्या वतीने स्वागत करुन आभार मानण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुस्थानी होते. या महापुरुषांनी गोरगरीब बहुजनांच्या उद्धारासाठी केलेले कार्य मोठे आहे. या गुरु शिष्यांचे पुतळे शहरात जयंती दिनाच्या पूर्वी उभारणे अपेक्षित आहे. दोन्ही महापुरुषांचे पुतळे एकाचवेळी उभारल्यास समस्त बहुजन समाजासह नगरकरांना आनंद होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पूर्ण कृती पुतळा 11 एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंती दिनापूर्वी उभारण्याची मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
COMMENTS