देशातून 15 हजार तर अहमदनगर जिल्ह्यातून तीनशेपेक्षा जास्त पेन्शनर्सचा सहभाग अहमदनगर । नगर सह्याद्री किमान 9 हजार पेन्शन व इतर मागण्यांसाठी...
देशातून 15 हजार तर अहमदनगर जिल्ह्यातून तीनशेपेक्षा जास्त पेन्शनर्सचा सहभाग
अहमदनगर । नगर सह्याद्री
किमान 9 हजार पेन्शन व इतर मागण्यांसाठी देशातील ईपीएस 95 पेन्शन धारकांनी दिल्लीतील रामलीला मैदान व जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात देशातील पाच संघटनांच्या 15 हजार ईपीएस 95 पेन्शनर्सनी सहभाग नोंदवला. दिल्लीच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल तीनशेपेक्षा जास्त ईपीएस 95 पेन्शनर्सनी सहभागी नोंदविला.
गेल्या 10 वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ व्हावी, म्हणून देशातील पेन्शन संघटना एकत्र आंदोलन करीत आहेत. पण या मागणीला यश आले नसून, महागाईच्या काळात ईपीएस 95 पेन्शनर्सला फक्त पाचशे ते दोन हजार पाचशे पर्यंत पेन्शन मिळते. तसेच त्यांचे इतर मागण्यांकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्याने त्यांचा जगण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने 7 व 8 डिसेंबरला दिल्लीत देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास खासदार महंमद वजीर (केरळ), एल. मारण करीम (केरळ), ए. के. राघवन (तमिळनाडू), एन. के. प्रेमचंद्रन (केरळ), श्रीदेवी कुमार (तमिळनाडू), पी.आर. नागराजन (तमिळनाडू), राजेंद्र गावित (महाराष्ट्र) यांनी आंदोलनाला भेट देऊन ईपीएस 95 पेन्शनर्सना पाठिंबा दिला.
महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेच्या पदाधिकार्यांनी खा. डॉ. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांना दिल्ली येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी या मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दादा झोडगे यांनी सर्वोच्च न्यायालयाने हायर पेन्शनबाबत व न्यायालयाच्या निकाल बाबत केंद्र सरकारने चार महिन्यात आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. तर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने पेन्शनर्सबाबत दिलेल्या निकालाची माहिती दिली. सुभाष कुलकर्णी यांनी भगतसिंग कोशियारी समितीचा अहवाल 2013 साली स्वीकारला असता, तर आज पेन्शन धारकांना रुपये 9 हजार पेन्शन मिळाली असती. त्यावर महागाईभत्ता देखील मिळाला असल्याचे सांगितले. अतुल दिघे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकालासाठी व पेन्शन वाढ मिळवून घेण्यासाठी सतत आंदोलन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. भीमराव डोंगरे यांनी 2023 सालापर्यंत सध्याच्या सरकारने किमान पेन्शन 9 हजार केली नाही, तर देशातील सर्व संघटना एकत्र आणून देशातील 72 लाख पेन्शन धारकांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आवाज उठून येत्या लोकसभेला एक जूट दाखविण्याचे आवाहन केले. या धरणे आंदोलनामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्जेराव दहिफळे, बाबुराव दळवी, अंकुश पवार, आबा सोनवणे, संपतराव कळसकर, नानासाहेब शेळके, भगिनाठ काले, बापूसाहेब धनवट यांनी सहभाग नोंदवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाप्रसंगी किसनराव उरे, बाबासाहेब खरात, बापू हिंगे, बाळासाहेब जाधव, प्रकाश मुसमाडे, मुकुंद पंथ, कृष्णराव फोपसे, वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.
आंदोलकांच्या प्रमुख शिष्टमंडळाने पंतप्रधान व केंद्रीय कामगार मंत्रीच्या कार्यालयात निवेदन देऊन दोन दिवसीय आंदोलन स्थगित केले.
COMMENTS