दहापैकी अवघ्या एका जागेवर यश । भाजप प्रणीत पॅनेलचा दणदणीत विजय पुणे । नगर सह्याद्री - सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटा...
दहापैकी अवघ्या एका जागेवर यश । भाजप प्रणीत पॅनेलचा दणदणीत विजय
पुणे । नगर सह्याद्री -
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ एकच जागा मिळवता आली असून, नऊ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्ष प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यापीठ विकास मंच या पॅनेलने वर्चस्व राखले.
विद्यापीठ अधिसभेची निवडणूक यावेळी बरीच गाजली. कधी नव्हे ते यावेळी या निवडणुकीला पक्षीय स्वरूप आले होते. राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नगरमध्ये येऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेत विद्यापीठ विकास मंचवर आरोप करताना स्वतःच्या विजयाचा दावा केला होता.
मतदानानंतर मंगळवारी रात्री उशिरा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. भारतीय जनता पक्ष प्रणीत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा वरचष्मा असलेल्या विद्यापीठ विकास मंचाने दहापैकी नऊ जागांवर विजय मिळवला. यामध्ये खुल्या गटात प्रसेनजित फडणवीस, सागर वैद्य, युवराज नरवडे, दादाभाऊ भिकाजी शिनलकर, अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे, भटक्या जाती प्रवर्गातून विजय सोनवणे, इतर मागास प्रवर्गातून सचिन गोरडे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून गणपत नांगरे आणि तर महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर यांनी विजय मिळवला.
COMMENTS