पारनेर । नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडून महाराष्ट्रासह देशाची अस्मिता असणारा छत्रपती शिवाजी महार...
पारनेर । नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडून महाराष्ट्रासह देशाची अस्मिता असणारा छत्रपती शिवाजी महाराज व आदर्श असणारा महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली जात आहे. तरी यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था व शांतता धोक्यात येत आहे. तरी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून दूर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या काही नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान केला जात आहे. यापुर्वीही राज्यपाल यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमानास्पद उल्लेख करुन तमाम मराठी माणसांची मने दुखावली होती.
राज्यपाल यांच्याकडून शिवरायांचा अवमानास्पद उल्लेख झाल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील अशीच मुक्ताफळे उधळली. हे सातत्याने जाणिवपूर्वक होत आहे. आता महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. आम्हा मराठी माणसांसाठी शिवराय म्हणजे श्वास आहेत. त्यांचा अवमानास्पद उल्लेख आम्ही मराठी माणूस कदापि सहन करणार नाही.
एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणार्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. राज्यपाल आणि राज्याची जनता यांच्यामध्ये परस्पर विश्वास व सौहार्दाचे एक नाते असणे गरजेचे आहे. पण राज्यपालांच्या वक्तव्यांमुळे ते शिल्लक राहिले नाही. म्हणून माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून दूर करावे अशी मागणी केली आहे.
COMMENTS