दैनिक नगर सह्याद्रीच्या वृत्ताने बांधकाम विभागाला जाग सुपा । नगर सह्याद्री - राज्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्याती...
दैनिक नगर सह्याद्रीच्या वृत्ताने बांधकाम विभागाला जाग
सुपा । नगर सह्याद्री -
राज्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील वाळवणे येथिल भैरवनाथ मंदीराकडे जाणार्या व रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जाणारा सुपा वाळवणे रायतळे या रस्त्यावर दिवसा ढवळ्या बेसुमार मुरूम, खडी, बांधकामासाठी लागणारी डस्टची अवैध्य अवजड वाहतुक केली जात आहे. यामुळे रस्त्याचे तिन तेरा वाजले आहेत. सुसाट वेगाने चालणार्या या हायवामुळे इतर वाहनांसह मोटारसायकल चालकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याबाबत दैनिक नगर सह्याद्री वृत्त प्रसिद्ध करताच झोपेचे सोंग घेतलेल्या बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. व रस्त्यावर पडलेले मोठ मोठेखड्डे बुजवण्या प्रारंभ करण्यात आला.
दैनंदिन दळणवळणासाठी लागणार्या या रस्त्यावर रात्रंदिवस ओव्हलोड अवजड वाहतुक सुरू असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे छोट्या- मोठ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रूईछक्षत्रपती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने सुपा वाळवणे येथील नागरीकांना या रस्त्यावरून ये- जा करावी लागते. तर शेतकर्यांनी पिकवलेला माल मुख्य बाजार पेठ असलेल्या सुपा, पारनेर, अहमदनगर,पुना याठिकाणी नेण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो.
या रस्त्यावरून दुध उत्पादक, शालेय विद्यार्थी, सुपा औद्योगिक वसाहत मधील कामगारांना रात्री अपरात्री या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अनेकांना पाठ दुखी, कंबर दुखी यासह मनक्याचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर बांधकाम विभागाने अनेक दिवसांपासून दुर्लक्ष केल्याने रस्त्याची पुर्णपणे चाळण झाली होती.
कारवाईचा नुसता फार्स करणार्या तहसिलदारांनी दिवसाढवळ्या सुरू असणारी अवैद्य वाहतुकीवर कारवाई करून हे वाहणे तातडीने बंद करावेत व बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील रूईछत्रपतीचे सरपंच मच्छींद्रनाथ दिवटे, उपसरपंच मिनाताई दिवटे, वाळवणेचे सरपंच जयश्री पठारे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला होता. याला यश आले असून बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता दुरूस्तीला सुरूवात झाली असल्यामुळे सरपंच दिवटे, उपसरपंच मिनाताई दिवटे, वाळवणेचे सरपंच पठारे, माजी सरपंच उत्तमराव पठारे यांच्यासह ग्रामस्थ व प्रवाशांनी दैनिक नगर सह्याद्री चे आभार मानले आहेत.
COMMENTS