पोलिसांनी शिताफीने शोधला खुनी पारनेर । नगर सह्याद्री कल्याण रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झा...
पोलिसांनी शिताफीने शोधला खुनी
पारनेर । नगर सह्याद्री
कल्याण रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानुसार पारनेर पोलिसांनी अज्ञात वाहन चालक आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, हा मृत्यू अपघाती नसून त्या दुचाकी चालकाला पाठलाग करून चार चाकी वाहनाने धडक दिली आणि त्या दुचाकी चालकाजवळ असणारी रोकड व सोने असा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप व त्यांच्या सहकार्यांनी शोध मोहीम राबवली आणि धक्कादायक बाब समोर आली. दत्तात्रय सखाराम शिर्के रा. कर्जुले हर्या व त्याच्या सहकार्याने या दुचाकीस्वाराला चार चाकी वाहनाने जोराची धडक दिली आणि त्याच्या ताब्यातील रोकड व सोने पळवून नेल्याचीे बाब स्पष्ट झाली. दत्तात्रय शिर्के याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. निलेश लंके प्रतिष्ठानचा तालुकाध्यक्ष म्हणवून घेणार्या बापू शिर्के याचा दत्तात्रय शिर्के हा भाऊ आहे. दरम्यान मयत रविंद्र उदावंत हे अकोले तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि टाकळी ढोकेश्वर येथे वास्तव्यास होते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रविंद्रकुमार बबनराव उदावंत रा. वासुंदे रोड, टाकळी ढोकेश्वर हे त्याच्या दुचाकीवरून कल्याण रस्त्याने कर्जुले हर्या शिवारातून जात असतना पाठीमागून पाठलाग करीत आलेल्या चार चाकी वाहनाने त्यांना जाणूनबुजून जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी अज्ञात वाहन चालक आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या घटनेची माहिती घेत असताना रविंद्र उदावंत यांचा अपघाती मृत्यू नसून त्यांचा घातपात झाल्याची खबर पोलिसांना लागली. त्यादृष्टीने पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी तपासाची सुत्रे हलवली असता मयत उदावंत हे कासारे फाटा येथील दत्तात्रय शिर्के याच्या जत्रा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते अशी माहिती मिळाली. येथेच उदावंत यांच्याकडे काही रोकड असल्याचे आणि सोन्याचे दागिने असल्याचे अनेकांनी पाहिले होते. जेवण आटोपून उदावंत हे दुचाकीवरून निघाल्यानंतर दत्तात्रय शिर्के व त्याच्या सोबतच्या एकाने चार चाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला आणि एका वळणावर त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. उदावंत हे खाली पडताच या दोघांनी त्यांच्याकडील ऐवज ताब्यात घेतला आणि तेथून पळ काढला. काहीवेळाने हे दोघेही तेथे आले आणि अपघातग्रस्ताला मदत करीत असल्याचे नाटक केले. मात्र, या दोघांनी पाठलाग केल्याचे आणि गाडीला धडक देऊन उदावंत यांना जायबंदी केल्याची व ऐवज काढून नेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले आणि त्याने याबाबतची माहिती उदावंत यांच्या नातेवाईक़ांना दिली आणि या गुन्ह्याला वाचा फुटली.
पारनेर पोलिसांनी दत्तात्रय शिर्के याची चार चाकी ताब्यात घेतली आणि त्याला अटकही केली. नरेंद्र दगडू केदार यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खुनाचा गुन्हा दाखल होऊन पोलिस कोठडीत असलेल्या शिर्के याच्याकडून पोलिस आता त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. पारनेर पोलिसांनी अत्यंत शिताफीने या खुनाच्या घटनेचा तपास लावल्याबद्दल पोलिस निरीक्षक बळप आणि त्याच्या सहकार्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
COMMENTS