दोन वर्षात १३ बिबट्यांचा मृत्यू ः पिंजरा लावण्याची ग्रामपंचायतीची मागणी पारनेर | नगर सह्याद्री पारनेर वनविभागाच्या परीक्षेत्रामधील २६ गाव...
दोन वर्षात १३ बिबट्यांचा मृत्यू ः पिंजरा लावण्याची ग्रामपंचायतीची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर वनविभागाच्या परीक्षेत्रामधील २६ गावांमध्ये बिबट्याचे वास्तव्य आढळून आले असून स्थानिक ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पारनेर वनविभाकडे फक्त पाचच पिंजरे असून त्यापैकी एक पिंजरा जुन्नर येथील बिबट्या निवारण केंद्रात नेण्यात आला असल्याची माहिती पारनेरच्या वन परिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. गोरे यांनी दिली.
रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेले भारनियमन तर दुसरीकडे रात्री बिबट्याची चक्रव्युहात शेतकरी अडकला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे जीव मुठीत धरून शेतकरी कुटुंबातील सदस्यांना शेतीकाम करावे लागत आहे. पारनेर वन विभागाच्या परिसरात येणार्या पुणेवाडी, वडनेर, हवेली, म्हसणे, शिरापूर, लोणी मावळा, निघोजसह वाड्यावस्त्या, जवळा, राळेगण थेरपाळ, नारायणगव्हाण, बाभुळवाडे, भाळवणी, जामगाव (शिंदे वाडा), ढवळपुरी, कोहकडी, मावळेवाडी, पांढरकरवाडी, यादववाडी, हत्तलखंडी, पठारवाडी, पानोली, वडनेर बुद्रुक या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची लेखी मागणी वन विभागाला केली असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सांगितले.
बिबट्याबाबत गावागावात दवंडी ः गोरे
बिबट्याची संख्या अनेक गावात आढळून येत असून तेवढ्या प्रमाणात पिंजरे उपलब्ध नाहीत. बिबट्यापासून बचाव करण्यासाठी गावागावात दवंडीसह भित्तिपत्रके व जनजागृती सुरू केली असल्याची माहिती पारनेर वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी एस. व्ही. गोरे यांनी दिली. कुकडी नदीकाठच्या जुन्नर व पारनेर तालुयातील गावांत ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याचे वास्तव्य आढळून येत आहे. त्यामुळे या बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी काही सूचनाही स्थानिक ग्रामस्थांना दिल्याचे ते म्हणाले.
दोन वर्षात १३ बिबट्यांचा मृत्यू
जुन्नर तालुयाच्या हद्दीवर काही गावी असल्याने बिबटे मोठ्या प्रमाणावर आढळतात. भक्ष आणि पाण्याच्या शोधात हे बिबटे येत असून पक्षाचा पाठलाग करताना किंवा इतर अन्य कारणाने दोन वर्षाच्या कार्यकाळात १३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस. व्ही. ग़ोरे यांनी दिली.
COMMENTS