निघोज / नगर सह्याद्री प्रत्येक वर्षी माउलींच्या दर्शनासाठी येणारे माजी विद्यार्थी यावर्षी मात्र स्नेहसंमेलन निमित्ताने एकत्...
निघोज / नगर सह्याद्री
प्रत्येक वर्षी माउलींच्या दर्शनासाठी येणारे माजी विद्यार्थी यावर्षी मात्र स्नेहसंमेलन निमित्ताने एकत्र आले असले तरी ४० वर्षांनी एकत्र येत माउलींच्या दर्शनाचा आनंद घेत या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सुखा दुखाची विचारणा करीत सामाजिक कामांना प्रोत्साहन देत मदतीचा हात पुढे करीत स्नेहसंमेलन माध्यमातून सामाजिक कामांचा संदेश देण्याचे काम केले आहे.
कुमार छात्रालय येथे राहून महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे १९८३ ते १९८७ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आळंदी येथे पार पडले.यात प्रथम गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर प्रत्येकाने स्वतः चा स्वपरीचय करून दिला त्यानंतर विविध क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे अशा गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.या मध्ये वडझिरे येथील श्रीकांत तोडकर यांचा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ,शिवाजी नरवडे यांचा सकाळचा सन ऑफ साऊथ या उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल ,संपत खैरे यांचा कमिन्स पुणे चा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल ,राजेंद्र तोडकर यांचा महाराष्ट्र जांभूळ उत्पादक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल,लेखक विजय शेंडगे यांचा तमोहरा ,अमृत स्पर्श आणि पिपाणी या पुस्तक लिखाणाबद्दल ,तसेच शशिकांत वाकडे यांचा सोलर उपक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व बालमित्राच्या तर्फे शाल ,श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
४० वर्षानंतर ७५मित्र भेटल्या मुळे खूप गप्पा गोष्टी झाल्या. सर्वांच्या सुख दुःखाच्या गोष्टी झाल्या.सर्व मित्रांमध्ये आर्थिक ओढाताण असलेल्या व असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या नामदेव दुर्गे या मित्राला औषधोपचार करण्यासाठी सर्वांनी मिळून १लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.शिवाय पुढील औषधोपचाराची जबाबदारी या सर्व बालमित्रांनी घेतली.त्यामुळे भारावून गेलेल्या नामदेवचे डोळे पाणावले.त्याने मदतीबद्दल सर्व मित्रांचे आभार मानले.तसेच बालमित्रानी आपल गाव फाउंडेशन ,बाभुळवाडे या स्वयंसेवी संस्थेला वृक्षारोपण ,सामाजिक कामे करण्यासाठी ११ हजारची देणगी दिली. तसेच आपलं गाव फौंडेशन माध्यमातून राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचे उपस्थीतांनी कौतुक करीत फौंडेशनचे अध्यक्ष डॉ सुरेश खणकर तसेच पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ यांचे कौतुक केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ .सुरेश खणकर यांनी सर्व मित्रांचे यांबदल आभार मानले. सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री.प्रमोद जगताप यांनी केले .स्नेहसंमेलनाचे पूर्ण नियोजन करून ४० वर्षे दूर असलेल्या सर्व बालमित्राना एकत्रित आणण्याचे काम केल्याबद्दल रावसाहेब देंडगे,डॉ .सुरेश खणकर ,राजेंद्र तोडकर आणि रुपचंद गजरे यांचे सर्व बालमित्रांनी आभार मानले .
COMMENTS