मुंबई । नगर सह्याद्री - योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. रा...
मुंबई । नगर सह्याद्री -
योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ज्यावेळी बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले तेव्हा त्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. पण, त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीसांना कोपरखळी मारली आहे. बाबा रामदेव महिलांबाबत असे बोलत असताना आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी सणसणीत कानाखाली वाजवायला हवी होती असं संजय राऊत म्हणाले आहे.
बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, हे लज्जास्पद विधान केले असताना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी तिथे बसलेल्या होत्या. असे असताना आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणीही आणि कितीही मोठा असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला हवी होती असं राऊत म्हणाले आहे.
तसेच एका बाजूला तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात, ज्ञान पाजळतात. त्याचवेळेला एक बाब, भगवे वस्त्र परिधान करणारा महिलांचा अपमान करतो. राज्यपाल शिवाजी महाराजांचा अपमान करतात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर,सांगली खेचून घेण्याची भाषा करतात आणि हे सरकार शांत बसते. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का हे मला पाहायचे आहे असा टोलाही त्यांना सरकारला लगावला आहे.
ठाण्यातील योगा कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटले आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
COMMENTS