मुंबई । नगर सह्याद्री - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भातील बैठकीसाठी फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. मात्र, या दौऱ्यामध्ये ते भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल बदलण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहे. राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा राज्यपालांना खडेबोल सुनावले आहे. तर कोश्यारींविरोधात शिवप्रेमींनी राज्यभरात आंदोलनही केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीकडून वारंवार केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील भाजप नेत्यांना देखील टीकेला समोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल बदलण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
जर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या विधानांबाबत वरिष्ठांसोबत चर्चा केली आहे. तर राज्याला नवे राज्यपाल मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या दिल्ली दौऱ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत राहिलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. फडणवीस-अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न, राज्यपालांचे कोरोना काळातील दौरे यावरुन बराच वाद देखील झाला आहे.
त्यातच भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, मराठी माणूस आणि मुंबई याबद्दल केलेल्या वक्तव्यांनी वाद निर्माण झाले होते. या वादावर पडदा पडतो ना पडतो तोच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेतील एका कार्यक्रमात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विधान केलं. त्यांच्या विधानावर चौहेबाजूंनी टीकाही झाली आहे.
आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भातील बैठकीसाठीदिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वारंवार केल्या जाणाऱ्या विधानांबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
COMMENTS