सावरकर प्रेमींची घोषणाबाजी अहमदनगर | नगर सह्याद्री राज्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वादंग सुरू असतानाच नगरमध्ये राज्य नाट्य स्पर्धेतील ‘...
सावरकर प्रेमींची घोषणाबाजी
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वादंग सुरू असतानाच नगरमध्ये राज्य नाट्य स्पर्धेतील ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकावरून वादंग निर्माण झाला. स्वातंत्र्यसेनानी सावरकर यांचा चुकीचा इतिहास दाखविला जात असल्याचे कारण देत सावरकर प्रेमींनी हे नाटक बंद पाडल्याने वाद निर्माण झाला. पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद गेला आहे.
६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारपासून नगर केंद्रावर सुरू झाली. या स्पर्धेत ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक पहिल्या दिवशी सादर झाले. या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमी चांगलेच चिडले. त्यामुळे नाटक अंतिम टप्प्यात असतानाच सावरकर प्रेमींनी सभागृहात उभे राहून, हे नाटक बंद करा, अशी घोषणाबाजी केली. तसेच या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असून अशा नाटकाचे प्रयोग राज्यात पुन्हा कुठेही होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले.
नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानने ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक सादर केले. या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमींनी केला. या नाटकांमध्ये दाखवण्यात आलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने गांधी हत्या केल्याचा नथुराम गोडसे यांना पश्चाताप झाला आणि यासाठी सावरकरही दोषी होते, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. याला सावरकर प्रेमींनी आक्षेप घेतला. नाटकाचा शेवटचा अंक सुरू असताना सभागृहातील एका गटाने उभे राहून तत्काळ नाटक बंद करा, अशी मागणी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत, हे नाटक सादर करणारे कलाकार, दिग्दर्शक व स्पर्धेच्या आयोजकांचा निषेध केला. काही ज्येष्ठ रंगकर्मी यांनी देखील या नाटकात चुकीचा इतिहास दाखवला असल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला. त्यावरही दोन रंगकर्मीच्या गटांमध्येही बाचाबाची झाली. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल आले. त्यानंतर या वादावर काही काळासाठी पडदा पडला.
राज्य नाट्य स्पर्धा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून घेण्यात येते. या स्पर्धेत येणार्या नाटकाची स्क्रिप्ट सेन्सॉरकडून मंजूर होऊन येते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने नाव घेणार्या राज्यातील सरकारने, ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाला परवानगी दिलीच कशी, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला. तसेच सेन्सफर बोर्ड नेमके कशा पद्धतीने काम करतेय व त्यांच्यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही, अशा भावनाही सावरकर प्रेमींनी व्यक्त केल्या.
मंगळवारी सादर झालेल्या नाटकामध्ये नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर व भारताची चुकीच्या पद्धतीने प्रतिमा दाखवण्यात आली आहे. भारताच्या संविधानाने जो खटला नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध चालवला, त्या खटल्यालाच या नाटकांनी एक प्रकारे आव्हान केलेले आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर दोषी असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. याबाबत आम्ही दोन दिवसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. मला या नाटकामुळे भरपूर त्रास झाला असून माझ्या संवेदनाशी या नाटकाने खेळ केला आहे.
- उत्कर्ष गीते, सावरकर प्रेमी.
COMMENTS